गोंदिया- कोरोना विषाणूचा संसर्ग संपूर्ण देशभर वाढतच चालला आहे. या विषाणूला अटकाव करण्यासाठी केंद्र शासनाकडून संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणारे आणि गरीब लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या गरजूंना सहयोग समुहातर्फे अन्नधान्य किट वितरित केले जात आहे.
कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या नागरिकांची मदत करण्यासाठी सहयोग समुहातर्फे 'सहयोग अन्नपूर्णा सेवा' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार समुहाचे सेवाभावी कर्मचारी मागील १ महिन्यापासून गोंदिया, गोरेगाव, आमगाव, सालेकसा, सडक अर्जुनी, मोरगाव अर्जुनी, तसेच नागपूर व पारशिवनी येथे गरजू कुटुंबांना अन्नधान्याची किट पोहचवित आहेत. सहयोग समुहातर्फे जिल्ह्यातील दुर्गम गावात व नक्षल प्रभावित क्षेत्रातही सेवा दिली जात आहे. जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून गरजू लोकांची यादी आल्यावर त्यानुसार महिला बचत गट, गावागावातील अधिकृत स्वयंसेविका आणि संघटनेचे प्रतिनिधी यांच्यातर्फे अन्नधान्याची किट गरजू कुटुंबांपर्यत पोहचविली जात आहे. संयोग समुहाने आतापर्यंत ७ हजारच्या वर अन्नधान्याची किट वाटप केल्या आहेत, तर लॉकडाऊन संपल्यानंतर देखील मदत उपक्रम सुरू राहणार असल्याचे संयोग समुहातर्फे सांगण्यात आले.
हेही वाचा- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात जंतुनाशक फवारणी