गोंदिया - जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असून तिरोडा तालुक्याला देखील या आजाराने घट्ट विळखा घातला आहे. 25 रुग्णांच्या अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात रुग्णांची संख्या 708 झाली आहे.
तिरोडा तालुक्यात कोरोनामुळे वडिलाचा मंगळवारी 11 ऑगस्ट रात्रीच्या सुमारास उपचारादरम्यान गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. तर मुलाचा नागपूर येथे वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनामुळे मृत्यू झाला. वडिलांपाठोपाठ मुलाचा सुद्धा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबावर संकट कोसळले आहे.
कोरोना केअर सेंटर व क्वारंटाइन सेंटरमध्ये असलेल्या व्यक्तींना योग्य प्रकारे उपचार व सुविधा मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी रोज होतात. तरी सुद्धा यात कुठलाही सुधारणा होत नाही. जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकडा ८ झाला आहे. त्यामध्ये गोंदिया तालुक्यातील मुंडीपार 1, गोंदिया शहरातील रेल्टोली परिसरातील 1, तर न्यू लक्ष्मीनगर परिसरातील 1, सडक-अर्जुनी तालुक्यातील खोडशिवणी १ तर तीरोडा तालुक्यात गराडा 1, पाटीलटोला १, बिरसी येथील वडील मुलाचा 2 समावेश आहे, तर तिरोडा तालुक्यातील मृतांची संख्या 4 झाली आहे.
10 ऑगस्टला तिरोडा तालुक्यातील पाटील टोला येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर लगेच खोडगाव येथील पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण आहे. खोडगाव येथील 35 वर्षीय तरुणाचा अहवाल 7 ऑगास्टला पॉझिटिव्ह आल्याने त्याला सरांडी येथील सेंटरमध्ये ठेवण्यात आले. तर त्याचे आईवडील व पत्नीला औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे क्वारंटाईन करण्यात आले होते. युवकाची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांला केटीएस रुग्णालय गोंदिया व तेथून नागपूर येथे हलविण्यात आले होते.