गोंदिया - मागील तीन दिवसांपासून संततधार बरसत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ४१५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून शेतकरी मोठ्या आशेने पुन्हा एकदा कामाला लागला आहे. अपेक्षेच्या तुलनेत आत्तापर्यंत झालेला पाऊस कमीच आहे. त्यामुळे आजही दमदार पावसाची प्रतिक्षा कायम आहे.
जिल्ह्यातील पर्जन्यमान बघता आतापर्यंत सरासरी ६४४ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. मात्र, वरुण राजाची नाराजी जिल्ह्याला चांगलीच भोवली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ४१५ मिमी पावसाची नोंद झाली असून अद्याप सरासरी २२९ मिमी पावसाची तूट कायम आहे. जून महिना कोरडा गेला असतानाच जुलै महिन्यातही पावसाने अपेक्षापूर्ती केली नाही. पंधरावडाभर दडी मारल्यानंतर मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे.
मध्यंतरी पावसाने दडी मारल्याने कित्येकांची रोवणी अडकून पडली होती. नर्सरी वाळत आल्याचे चित्रही जिल्ह्यात होते. या पावसामुळे शेतकरी रोवणीच्या कामाला लागला आहे. पावसाच्या खेळीने उशीर झालेला असतानाही शेतकरी नव्या जोमाने कामाला लागल्याचे चित्र आहे.