गोंदिया - जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने धरणांमध्ये मुबलक प्रमाणात पाणीसाठा आहे. मात्र, सिंचन विभागाच्या (एरिगेशन) ढिसाळ नियोजनामुळे शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी ईटियाडोह धरणाच्या कालव्यात बसून पाण्यासाठी उपोषण केले.
ईटियाडोह धरण यावर्षी 100 टक्के भरले होते. आत्ता धरणात 95 टक्के पाणीसाठा आहे. असे असूनही परिसरातील पंपधारक शेतकऱ्यांनी धरणाचे पाणी मिळत नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कालव्यात बसून आमरण उपोषणाला सुरुवात केली.
गोंदिया जिल्ह्याचे माजी पालक मंत्री राजकुमार बडोले यांनी शेतकऱ्यांना भेट दिली. शेतकऱ्यांच्या मागण्या योग्य आहेत. अधिकाऱ्यांनी यावर लवकरात लवकर मार्ग काढावा, असे बडोले यांनी सांगितले. 'जो पर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तो पर्यंत कालव्यातच बसून राहू', अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.