गोंदिया - जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात मक्याची लागवड करण्यात आली होती. राज्य सरकारने आदिवासी विविध सेवा सहकारी संस्थेला मका खरेदी करण्याचे आदेश देवूनही मका खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही. त्यातच पावसाळ्याला सुरुवात झाल्याने मका खराब होण्याचा धोका निर्माण झाला आहे. संतापलेल्या शेतकऱ्यांनी नवेगावबांध-अर्जुनी मार्गावर मका फेकून आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केला आहे.
दरम्यान, आदिवासी विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी येऊन शेतकऱ्यांना मका खरेदी केंद्र लवकरच सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर संतापलेल्या शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. रब्बी हंगामात पीक बदल म्हणून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर मक्याची लागवड केली. केंद्र सरकारने राज्य सरकारमार्फत आधारभूत किमतीवर मका खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश पारित केले आहेत. आदिवासी सेवा सहकारी क्षेत्रातील मका हा प्रादेशिक व्यवस्थापक आदिवासी विभाग यांनी करावा, अशा सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत.
आदिवासींसह गैर आदिवासी शेतकऱ्यांनी मका खरेदी करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दोन दिवसांपूर्वी दिला होता. मात्र, संबंधित विभागाच्यावतीने काहीही प्रतिसाद मिळाला नाही. पावसाळा तोंडावर असतांनाही मका खरेदी सुरू न झाल्याने आज संतापलेल्या शेतकरी चक्क उपप्रादेशिक विभागाच्या कार्यालया समोर रस्त्यावर मका फेकून निषेध नोंदवला.