गोंदिया - एकोडी येथील ओबीसी वेलफेअर असोसिएशन गोंदियाव्दारा संचालित 'सेंट मदर तेरेसा नॅशनल इंग्लिश स्कुल' शाळेला स्वंय अर्थसहाय्यीत तत्वावर मान्यता देण्यात आली होती. मात्र, ज्या ठिकाणी ही शाळा सुरू करावयाची होती, त्या ठिकाणी शाळा सुरू न करता दुसऱयाच ठिकाणी शाळा सुरू करण्यात आली. त्यानंतर शासनाच्या शिक्षण विभागाने ही शाळा बंद करण्याचे आदेश दिले होते.
शिक्षणाधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांनी शाळेच्या मुख्याध्यापकाला २६ नोव्हेंबरला पत्र पाठवून तीन दिवसात शाळा कायमस्वरूपी बंद करण्याचे आदेश दिले. या आदेशाची अंमलबजावणी न केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचेही पत्रात म्हटले आहे. मात्र, ही शाळा अजूनही सुरूच आहे.
हेही वाचा - ...तर आम्ही कृषीखाते सुद्धा चांगल्या पद्धतीने सांभाळू -राजू शेट्टी
'सेंट मदर तेरेसा नॅशनल इंग्लिश स्कुल' शाळेची तक्रार लोकायुक्त तसेच शालेय शिक्षण व क्रिडा विभागाकडे केली होती. या तक्रारीवर माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी निर्णय देत शाळेला दिलेली परवानगी २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून रद्द केली. मात्र, पाच महिने उलटूनही शिक्षण विभागाने कोणतीही कारवाई केली नाही. शिक्षणमंत्र्यांच्या पत्राला शिक्षण विभागाने आणि शाळा संचालकाने केराची टोपली दाखवण्याचे काम केले.
शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांच्या इच्छेनुसार दुसऱ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत समायोजन करण्याच्या सुचनाही दिल्या. असे न केल्यास प्रशासनाच्यावतीने फौजदारी गुन्हा दाखल होईल असे पत्र दिले. मात्र, शाळा संचालकाने या पत्राकडे लक्ष न देता शाळा आज सुरूच ठेवली आहे.