गोंदिया - अनिल देशमुखांवर ईडीने जी कारवाई केली आहे, ती सूडबुद्धी आणि राजकिय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. गोंदिया येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अनिल देशमुखांवर ज्याप्रमाणे परमबीर सिंह यांनी आरोप लावले, ते कुठंतरी राजकीय हेतूने लावण्यात आले आहेत.
'न्यायालयावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न'
परमबीर सिंह हे न्यायालयात गेले. न्यायालयाच्या आदेशाने सीबीआय चौकशी सुरू झाली. अनिल देशमुख हे सीबीआय चौकशीला सहकार्य करत होते. त्यानंतर देशमुख त्यांच्यावर इडीने गुन्हा दाखल केला. देशमुख यांनी इडीच्या चौकशीलाही मदत केली. मात्र, ज्या दिवशी न्यायालयात तारखा असतात. त्याच दिवशी अशा कारवाया केल्या जातात. याचा अर्थ न्यायालयावर दबाव निर्माण करण्यासाठी या कारवाया केल्या जातात, असा प्रश्न नवाब यांनी उपस्थित केला आहे. संपूर्ण सीबीआय चौकशी असो किंबा ईडीची चौकशी असो, हे सगळे राजकीय हेतूने प्रेरीत असलेले कार्यक्रम आहेत, असेही मलिक म्हणाले.
'राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि महाविकास आघाडीतला नेता कारवायांना घाबरणार नाही'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता जनतेचा आधार राहीला नसून, ते इडी आणि सीबीआयसारख्या केंद्रीय यंत्रणांचा वापर करत आहेत. जसा बिहार आणि बंगालमध्ये केला. या कारवायांमुळे अनेक लोक आपला पक्ष सोडून भाजपामध्ये गेले. आता जो प्रकार बंगालमध्ये केला तसाच प्रकार महाराष्ट्रात सुरू आहे. ते अनिल देशमुखांवर कार्यवाही करू शकतात, काही मंत्र्यांना धमकी देऊ शकतात. मात्र, त्यांना समजले पाहिजे की, बंगालपेक्षा महाराष्ट्रातील जनता हुशार आहे. भाजपने बंगालमध्ये जे केले तेच जर महाराष्ट्रात केले, तर भाजपची बंगालसारखीच परिस्थिती महाराष्ट्रातही होईल. या सगळ्या कारवाया राजकीय हेतूने सुरू आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि महाविकास आघाडीतला एकही नेता या कारवायंना घाबरणार नाही, हे भाजपने लक्षात घ्यावे असही मलिक म्हणाले आहेत.