गोंदिया - सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेतच शालेय पोषण आहार शिजवून वितरित करण्यात येतो. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा १६ मार्चपासून बंद करण्यात आल्या. त्यामुळे मार्च व एप्रिल महिन्यातील शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना मिळाला नाही. त्यामुळे गोंदिया जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांना घरी जाऊन पोषण आहार सामुग्रीचे वितरण केले आहे. या उपक्रमामुळे लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या. अशावेळी शाळेत असलेली पोषण आहार सामुग्री शाळेतील गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्याचे अधिकार शाळा समितीकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार गोंदिया जिल्ह्यातील १ हजार २६४ शाळांमधील विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून घरपोहच शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यात आले.
शालेय विद्यार्थ्यांची गळती थांबवण्यासाठी शिक्षण विभागाने शालेय पोषण आहार योजना सुरू केली होती. मात्र, कोरोना लॉकडाऊन काळात राज्यासह गोंदिया जिल्ह्यात विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार द्यायचा कसा? असा प्रश्न निर्माण झाला होता. शाळेमध्ये विद्यार्थी येत नसले तरी शाळेतील विद्यार्थी उपाशी राहू नये, यासाठी राज्य शासनाने दिलेले शालेय पोषण आहाराचे धान्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्याची व्यवस्था प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांनी केली. यासाठी स्थानिक नियामक मंडळाने त्यांना मदत केली. यामुळे शाळेमध्ये कुठल्याही प्रकारची गर्दी झाली नाही.
लॉकडाऊनमुळे मजुरांवर उपासमारीची वेळ आली. या मजुरांची आणि शेतकऱ्यांची मुले देखील जिल्हा परिषद शाळेमध्ये जातात. या मुलांना घरपोहच धान्य मिळाल्याने कोरोना संकाटात जिल्हा परिषदेत शिकणाऱ्या मजुरांच्या व शेतकऱ्यांच्या मुलांना मोठा दिलासा मिळाला.