गोंदिया - हृदय विकाराचा झटका आल्यास अशा रुग्णांसाठी पहिला एक तास हा सुवर्णकाळ असतो. या काळात रुग्णाला योग्य उपचार मिळावे यासाठी हृदय रोग तज्ज्ञ डॉ. प्रमेश गायधने यांनी 'महाकॅप' (महाराष्ट्र कार्डिओलॉजी अवेअरनेस प्रोग्राम) या नावाने व्हाट्सअॅप ग्रुप तयार केला आहे. त्यांनी आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील ६००च्या वर डॉक्टरांना या ग्रुपमध्ये जोडले आहे. हृदय विकाराचा झटका येताच योग्य मार्गदर्शन करून या डॉक्टरांनी आतापर्यंत १००पेक्षा जास्त रुग्णांचे प्राण वाचवले आहेत.
आसोली या आदिवासी गावात जन्मलेल्या डॉ. प्रमेश यांचे वडील शेतकरी आहेत. आपण उच्च शिक्षण घेऊन लोकांना आरोग्याविषयक मदत करावी, असा ध्यास डॉ. प्रमेश यांनी घेतला होता. त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस पूर्ण केले. त्यांनंतर सोलापूर येथून एमडी मेडिसीन, अहमदाबाद येथे डीएम (हृदय विकार तज्ज्ञ) पदवीत सुवर्णपदक मिळवले. सुरुवातीला त्यांनी गुजरात येथील यु. एन. मेहता रुग्णायात चार वर्ष सेवा दिली. त्यानंतर आपल्याच जिल्ह्यातील दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांना सेवा देण्याचे ठरवले.
हेही वाचा - मेळघाटातील आदिवासी महिलांसाठी मशरूम प्रशिक्षण कार्यशाळा; जोडधंद्यातून रोजगारनिर्मितीसाठी प्रयत्न
गोंदियात येताच त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेताना भेटलेल्या डॉक्टर मित्रांचा महाकॅप हा व्हाट्सअॅप ग्रुप बनवला. या ग्रुपमध्ये राज्यातील २० हृदय रोग तज्ज्ञ तसेच गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील ६०० पेक्षा जास्त डॉक्टर जोडले गेले आहेत. यासाठी तीन 'महाकॅप १-२-३' नावाचे ग्रुप तयार केले गेले आहेत. ग्रामीण भागातील एखाद्या डॉक्टरांकडे छातीत दुखत असल्याची तक्रार घेऊन रुग्ण आल्यास त्याचा इसीजी काढून संबंधित डॉक्टर त्या इसीजीचा फोटो महाकॅप ग्रुपमध्ये टाकतात. हृदय रोग तज्ज्ञ तो रिपोर्ट तपासून प्रथमोपचार सुचवतात. ही सेवा नि:शुल्क असते. गोंदिया जिल्ह्यातील हिरापूर गावात राहणाऱ्या ७५ वर्षीय विजयाबाई कासारे यांना हृदय विकाराचा झटका आल्यानंतर या ग्रुपमुळेच त्यांचे प्राण वाचू शकले होते.
डॉ. प्रमेश गायधने त्यांनी 'महाकॅप' नंतर आता 'महासॅप (महाराष्ट्र सेल्फ अवेअरनेस प्रोग्राम) या ग्रुपची सुरुवात केली आहे. याद्वारे ते हृदय रोग टाळण्यासाठी उपाय सुचवतात. तसेच ते गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना करियरविषयी मार्गदर्शनदेखील करतात.