गोंदिया - विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस बुधवारी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांट आणि कोविड वॉर्डची देखील पाहणी केली. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, गोंदिया जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आहे. मात्र जिल्ह्यात म्युकर मायकोसिसच्या रुग्णांची संख्या वाढत असून, सध्या जिल्ह्यात या सध्या 23 रुग्ण आहेत. एका रुग्णाचा मृत्यू देखील झाला आहे.
राज्य सरकारने म्युकर मायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. मात्र राज्यात कुठेही म्युकर मायकोसिस रूग्णांवर कुठेही मोफत उपचार करण्यात येत नाही. त्यामुळे ही महाविकास आघाडी सरकारची घोषणा फसवी असून म्युकरमायसिसच्या आजारावरील औषधे, इंजेक्शन महागडी आहेत. रुग्ण व कुटुंबियांना घरदार विकून उपचार करून घ्यावे लागत आहे. असे होता कामा नये. रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातुन फक्त शासकीय व नोंदणीकृत रुग्णालयातच सुविधा न देता ज्या कोणत्याही रुग्णालयात म्युकर मायसिसच्या आजाराचे रुग्ण असतील. त्यांना औषधे व इंजेक्शन सरकारने मोफत पुरविण्याची मागणीही फडणवीस यांनी यावेळी केली.
मात्र ही महाविकास आघाडी सरकार बनवाबनवी करतेय असे मी म्हणणार नाही, पण सरकारने जनताभिमुख कामे करण्याचा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी दिला. ते गोंदियात आले असता पत्रकारांशी बोलत होते.