गोंदिया - पुरामुळे पूर्व विदर्भात भयावह स्थिती आहे. घरांसह शेतीचे नुकसान झाले आहे. मात्र, राज्य सरकारने पूरग्रस्तांना तातडीची मदत दिलीच नाही. तसेच कोणत्याही मदतीची घोषणा केली. मात्र, आधीच्या सरकारने पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण झाली होती तेव्हा सहा जीआर काढून मदत केली होती. त्याच धर्तीवर राज्य सरकारने पूर्व विदर्भातील पूरग्रस्तांना मदत करायला पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
देवेंद्र फडणवीस बुधवारी पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी भंडारा, गोंदिया जिल्ह्यांना भेट दिली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पूर्व विदर्भात निर्माण झालेली पूरपरिस्थिती हे मानवनिर्मित संकट आहे. प्रशासनाने वेळीच सावध केले नाही. त्यामुळे ही पुराची परिस्थिती उद्भवली असल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.
दरम्यान, मध्यप्रदेशातील चौराई धरणाचे पाणी सोडल्याने पूर्व विदर्भातील नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला होता. या पुराचे पाणी गावांमध्ये शिरले होते. त्यामुळे हजारो नागरिकांना स्थलांतरीत करण्यात आले. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या पाचही जिल्ह्यांना पुराचा मोठ्या प्रमाणात फटका बसला. शेतातील पिके वाहून गेली. घरे उद्ध्वस्त झाली. हसता-खेळता संसार पुराच्या पाण्यात वाहून गेला. मात्र, धरणातून पाणी सोडणार असल्याचे आधीच सांगितले असते, तर ही परिस्थिती आली नसती, असा आरोपही नागरिकांमधून होत आहे.