गोंदिया- जिल्याच्या बरबसपुरा गावात आज सकाळी पाण्यासाठी भटकंती करत जंगलातून गावात आलेल्या चितळ्याच्या पिल्लावर गावातील कुत्र्यांनी हल्ला केला होता. ही घटना गावकऱ्यांच्या निदर्शनास आल्या नंतर त्यांनी कुत्र्यांपासून चितळाच्या पिल्लाची सुटका करून त्यास जीवनदान दिले आहे.
गावकऱ्यांनी चितळ्याच्या पिल्लाला पाणी पाजल्यानंतर वनविभागाला याप्रकरणी माहिती दिली. वन विभागाच्या चमूने चितळ्याच्या पिल्लाला ताब्यात घेऊन त्याला वैद्यकीय तपासणीसाठी शहरातील जिल्हा पशू वैद्यकीय रुग्णालयात पाठविले. तपासणी नंतर पिल्लाला जंगलात सोडण्यात आले. बरबसपुरा हे गाव जंगल परिसराला लागून आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चितळ आहे. उन्हाळा सुरू झाल्याने वन्य जीव पाण्याच्या शोधात जंगलातून गावाकडे येतात. त्यांच्यावर गावातील कुत्रे हल्ले करतात. त्यामुळे, जंगलात पाणवठे तयार करावे, अशी मागणी बरबसपुरा ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली आहे.
हेही वाचा- कुलरच्या विद्युत धक्क्याने तीन वर्षीय मुलाचा मुत्यू