गोंदिया - जिल्हा सामान्य रुग्णालय येथील सहायक अधीक्षक याला तक्रारदाराकडून सात हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. देवानंद बाबुराव वासनिक असे लाचखोर सहायक अधीक्षकाचे नाव आहे.
शहरातील केटीएस सामान्य रुग्णालयात तक्रारदार हे 8 मार्च 2019 पासून कार्यरत आहेत. त्यांच्या विरूध्द गुन्हा नोंद असल्याचा पोलीस व्हेरिफिकेशन अहवाल प्राप्त झाला असता आरोपी देवांनद वासनिक या अधिकाऱ्याने तक्रारदारास 14 जानेवारी रोजी आपल्या कार्यालयीन कक्षात बोलावले. पोलीस ठाणे कळमेश्वर येथून तुझा पोलीस व्हेरिफिकेशन अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामध्ये तुझ्याविरूध्द वर्ष 2017 मध्ये जुगाराचा गुन्हा नोंद असल्याचे नमूद आहे.
हेही वाचा - नक्षलवाद्यांच्या उत्तर गडचिरोलीचा डीव्हीसीएम विलास कोल्हाचे एके-४७ सह पोलिसांसमोर आत्मसमर्पण
सदर पोलीस व्हेरिफिकेशन वरिष्ठांच्या निर्दशनास आणून दिला तर वरिष्ठ अधिकारी तुझी नोकरी तत्काळ रद्द करतील. सदरचा पोलीस व्हेरीफिकेशन अहवाल मी दाबून ठेवून वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देत नाही, असे सांगितले आणि यासाठी 10 हजार रूपयांची मागणी केली. मात्र, तक्रारदारास लाच रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार नोंदविली. तक्रार नोंदविल्यावर लाललुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहानिशा केली आणि यानंतर सापळा रचला.
हेही वाचा - गोंदियात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निषेधार्थ नागरिकांची स्वाक्षरी मोहिम
आज (शुक्रवारी) दुपारी 2 वाजेच्या सुमारास तक्रारदाराकडून 10 हजार रुपयांची मागणी केली. मात्र, तडजोड करून 7 हजार रुपयांची लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली. यावेळी आरोपी देवानंद वासनिक (सहायक अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय आमगाव) या अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक केली. या अधिकाऱ्याविरूद्ध गोंदिया शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास पोलीस करत आहेत.