गोंदिया - संपूर्ण देशात कोरोना विषाणूची दहशत पसरली आहे. यावर उपाययोजना म्हणून शासनाच्या वतीने लॉकडाउन करण्यात आला आहे. अशी परिस्थिती असतानाही गोंदिया नगर परिषद मात्र स्वच्छतेला व विशेष करून या आजाराबाबत गंभीर नसल्याची चर्चा सुरू असल्याने शेवटी नगराध्यक्ष अशोक इंगळे, मुख्याधिकारी चंदन पाटील आदींनी परिस्थितीचा आढावा घेऊन शहरातील मुख्य बाजार परिसरात जंतुनाशक फरवारणीला सुरुवात केली आहे.
गोंदिया नगरपालिकेचा आत्तापर्यंत विचार केल्यास स्वच्छतेविषयी पालिका कधीही गंभीर दिसत. शहरातील रस्ते नाली व त्यावर साचलेली घाण, ही नित्याचीच बाब झाली आहे, अशातच मागील पंधरवड्यापासून संपूर्ण देश कोरोना विषाणूच्या दशहतीने हादरला असताना पालिकेने त्यापासूनही धडा घेतलेला नाही.
राज्यासह देशात लॉकडाउनची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर व्हॉट्सअॅप समूहांच्या माध्यमातून शहरातील नागरिकांनी आवाज उठवला. त्यामुळे आजपासून जंतूनाशके फवारण्याचा निर्णय घेतला आणि अग्निशामक विभागाच्या वाहनाने मुख्य बाजार परिसरात या अभियानाला सुरुवात करण्यात आली. फवारणी संपूर्ण शहरात होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.