गोंदिया - गेल्या ९ दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता. मात्र, आज पुन्हा दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामुळे जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोनाची लागण झालेले दोन्ही तरुण गुजरातच्या अहमदाबाद येथून परतले आहेत.
शुक्रवारी तिरोडा तालुक्यातील चार तरुण अहमदाबाद येथून एका खासगी बसने नागपुरात आले. त्यानंतर हे तरुण दोन चारचाकी वाहने भाड्याने घेऊन तिरोडा तालुक्यात आले. याबद्दल माहिती मिळताच या सर्वांना प्रशासनाने क्वारंटाईन केले.
यापैकी एका तरुणाला कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्याचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले. त्या तरुणाचा अहवाल प्राप्त झाला असून त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या तरुणासोबत आलेल्या एका तरुणाचा अहवाल देखील पॉझिटीव्ह आला आहे. तर इतर दोघांचे अहवाल प्रलंबित आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत जे कोरोनाबाधित रुग्ण आढळले, त्यापैकी 26 मार्चला एक, 19 मे रोजी दोन, 21 मे रोजी 27, 22 मे रोजी 10, 24 मे रोजी 4, 25 मे रोजी 4, 26 मे रोजी एक, 27 मे रोजी एक, 28 मे रोजी 9, 29 मे रोजी तीन, 30 मे रोजी चार, 31 मे रोजी एक, 2 जूनला दोन आणि शुक्रवारी 12 जूनला एक, असे एकूण 70 कोरोनाबाधित आढळून आले .
जिल्ह्यातील विविध शाळा व संस्थांमध्ये 1 हजार 360 आणि घरी 1 हजार 599, अशा एकूण 2 हजार 959 व्यक्ती अलगीकरणात असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्याम निमगडे यांनी दिली.