गोंदिया - देवरी तालुक्यातील मगरडोह पोलीस दूरसंचार केंद्राच्या पोलीस पार्टी पथक आणि नक्षलवाद्यांमध्ये आज सकाळी झालेल्या चकमकीत एक संशयित नक्षलवादी जखमी झाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून उपचारासाठी हेलिकॉप्टरने नागपूरला हलविण्यात आले आहे.
चीचगड पोलीस स्टेशन अंतर्गत शस्त्र दूरसंचार केंद्र मगरडोहची पोलीस पार्टी राणीडोहच्या जंगलात सकाळी पेट्रोलींग करीत होती. दरम्यान अज्ञात नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांकडून प्रत्यूत्तर देताना एका संशयित नक्षलवाद्याला गोळी लागल्याने जखमी झाला. निळकंठ मडावी (वय ५२) असे त्याचे नाव आहे. चकमकीत इतर नक्षलवाद्यांनी पळ काढला. जखमी नक्षलवाद्याला ताब्यात घेत प्राथमिक उपचारासाठी देवरी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक होत असल्याने त्याला हॅलिकॉप्टरच्या माध्यमातून नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहे. मात्र हा संशयित नक्षली कुठल्या पार्टीचा आहे, याची अद्यापही ओळख पटू शकली नाही.