गोंदिया - मुर्री येथील रेल्वे क्रॉसिंगजवळ स्कूल व्हॅनच्या चाकाखाली येऊन लहान मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. धैर्य बावनकर(वय दीड वर्ष) असे मृत मुलाचे नाव आहे. दरम्यान, अपघातानंतर उपस्थित नागरिकांनी या वाहनाची तोडफोड केली.
शहरातील एस.सी.एस इंग्लिश स्कूल येथे १५ ऑगस्टला ध्वजारोहण कार्यक्रम होता. या कार्यक्रमानंतर स्कूल व्हॅन क्र. एम.एच. ३५/के. ३७०४ मुलांना घरी सोडण्यासाठी आली होती. मुर्री येथील बावनकर कुटुंबाच्या घरासमोर दुपारी १:३० वाजताच्या दरम्यान व्हॅन येऊन थांबली असता, धैर्यचे काका मुकेश बावनकर हे आपल्या मुलाला व्हॅनमधुन उतरविण्यासाठी गेले होते. त्याच दरम्यान, धैर्य हा व्हॅनच्या समोर येऊन उभा राहिला. चालकाला तो दिसला नाही. विद्यार्थी उतरताच चालकाने अॅक्सीलेटर दिले असता, व्हॅन वेगाने समोर गेली आणि धैर्यच्या डोक्यावरून व्हॅनचे चाक गेले त्यातच धैर्यचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर मारहाणीच्या भीतीने चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी शहर पोलिसांनी मुकेश बावनकर यांच्या तक्रारीवरून चालकाविरूध्द कलम २७९, ३०४ (अ) सहकलम १३४, १८४, १९७ मो.वा.का. अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. शवविच्छेदनानंतर धैर्यचा मृतदेह नातेवाईकांना सोपवण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काशीद करत आहेत.