गोंदिया - जिल्ह्यातील देवरी तालुक्यात चिचगड ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या हस्ते गेल्या १० दिवसांपूर्वी तहसील कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्याचा मोठा गाजावाजा देखील केला. मात्र, अद्यापही त्या कार्यालयाचे कुलूप उघडले नाही. तसेच नियुक्त अप्पर तहसीलदार सुद्धा आलेले नाहीत. त्यामुळे ही सरकारची जुमलेबाजी तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
काँग्रेसच्या मंचावर गृहनिर्माण मंत्री विखे-पाटील अन् पालकमंत्री फुकेंची उपस्थिती; चर्चांना उधाण!
देवरी तालुका हा आदिवासीबहुल, अतिदुर्गम, मागास आणि नक्षलग्रस्त तालुका आहे. यामध्ये चिचगड परिसरातील गावांचा समावेश होतो. चिचगडपासून देवरीचे अंतर सुमारे २० किलोमीटरपेक्षा जास्त आहे. यामुळे या परिसरातील लोकांना सुमारे ५० किमीपेक्षा लांब अंतर कापून लहान-लहान कामासाठी देवरी गाठावी लागते. प्रवासाची अत्यल्प साधने आणि अपुरा पडणारा वेळ यामुळे या भागातील लोकांना प्रशासकीय कामे करण्यासाठी खूप मानसिक, आर्थिक आणि शारिरीक कष्ट सोसावे लागत आहेत. परिणामी, चिचगडला स्वतंत्र तहसील कार्यालयाची मागणी गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होती. मात्र, विधानसभेच्या तोंडावर ती पूर्ण झाली.
धक्कादायक..... गोंदियात नगर परिषदेत होतेय अर्जांवर बोगस सही, शिक्क्यांचा वापर
राज्यातील विधानसभेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे अशा अनेक संधीचे सोने करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी झपाट्याने कामाला लागले असल्याचे चित्र संपूर्ण विधानसभा क्षेत्रात पाहायला मिळत आहे. याचाच एक भाग म्हणून निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी स्थानिक आमदार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी भूमिपूजन आणि उद्घाटनाचा सपाटा या मतदार संघात लावला आहे. त्यामध्ये बहुप्रतिक्षित असलेले चिचगड येथील अप्पर तहसील कार्यालयाचे उदघाटन सुध्दा गेल्या १० तारखेला पालकमंत्र्यांच्या हस्ते मोठ्या धडाक्यात करण्यात आले. या कार्यालयाला कोणी उके नावाचे अप्पर तहसीलदार नियुक्त झाल्याची सुध्दा चर्चा आहे. मात्र, १० दिवस उलटून देखील या कार्यालयाचे कुलूप अध्यापही उघडले नाही. याशिवाय येथे नियुक्त तहसीलदार सुध्दा गायब आहेत. शिवाय लाखो रुपयांची उधळपट्टी करून सुरू करण्यात आलेल्या अप्पर तहसील कार्यालयात सरकारने एकही कर्मचारी नियुक्त केला नाही. नागरिक अनेक शंका कुशंका व्यक्त करीत आहेत.