गोंदिया - भारतीय संस्कृतीत महिलांना अत्यंत मानाचे स्थान आहे. नवरात्री उत्सवात देखील महिलेला मोठा मानसन्मान दिला जातो. मात्र एकीकडे महिलांना देवी स्वरुपात पुजले जात असले तरी दुसरीकडे महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून महिला किती सुरक्षित आहेत, असा सवालही उपस्थित होत आहे.
सरकारने महिलांविषयी कितीही कठोर कायदे केले तरी या बुरसटलेल्या समाजात महिलांवरील अत्याचाराच्या घटना दररोज समोर येत असतात. जिल्ह्यात पोलिसांनी महिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत. अशाप्रकारच्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी दामिनी पथक, महिला सेल, महिला तक्रार निवारण कक्ष (भरोसा सेल) ची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस प्रशासन व विविध पोलीस दलाचे पथक सतत काम करत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात यावर्षी महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये ७० टक्क्यांनी घट झाली आहे. याबाबत पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांनी माहिती दिली.
जिल्ह्यात २०१५ ते वर्ष २०१९ मध्ये महिला व मुलींवर झालेल्या अत्याचाराचे प्रमाण वाढले होते. तर वर्ष २०२० च्या नोव्हेंबर महिन्यापर्यंतच्या अहवालानुसार जिल्ह्यात महिलांवर व मुलींवर होणाऱ्या अत्याचारामध्ये ७० टक्के घट झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार वर्ष २०१५ मध्ये महिलांवरील अत्याचाराचे ३४ व अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचे पोक्सो कायद्यांतर्गत २९, विनयभंगाचे ८७ गुन्हे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आले होते. तर, वर्ष २०१६ मध्ये महिला व मुलींवरील अत्याचाराचे ४४ व विनयभंगाचे ८७ गुन्हे, २०१७ मध्ये अत्याचार व पोक्सो कायद्यांतर्गत एकूण ५९ गुन्हे व विनयभंगाचे ९८ गुन्हे दाखल करण्यात आले. वर्ष २०१८ मध्ये महिलांवरील अत्याचार व अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे एकूण ६५ गुन्हे तर, विनयभंगाचे १४३ गुन्हे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले. वर्ष २०१९ मध्येही महिलांवरील व अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचे ७३ गुन्हे, विनयभंगाचे १८० प्रकरण दाखल करण्यात आले होते.
तसेच जानेवारी ते सप्टेंबर २०२० च्या सप्टेंबर महिन्याच्या कालावधीत महिलांवर झालेले अत्याचार व मुलींवर झालेले अत्याचार पोक्सो कायद्याचे एकूण ३५ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच विनयभंगाचे आतापर्यंत ५८ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत वर्ष २०१५ ते वर्ष २०२० च्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत महिला व मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये घट झाल्याचे समोर आले आहे. महिला व मुलींवर अत्याचाराच्या तक्रारींची पोलीस विभागातर्फे तातडीने कारवाई केली जाते. याचे चांगले परिणामही समोर येत आहे. त्यामुळेच, मागील वर्षांच्या तुलनेत यावर्षी अशा घटनांमध्ये लक्षणीय घट झाली असल्याचे पोलीस निरीक्षकांनी सांगितले.
हेही वाचा - 'अजित पवार यांना नोटीस पाठवणं म्हणजे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न'