गोंदिया - उत्तर प्रदेशातील हाथरस मध्ये मागास तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाचे गोंदियात पडसात उमटले आहेत. पीडित तरुणीसोबत आरोपींनी केलेल्या क्रौर्यामुळे आरोपींना कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी सुदर्शन समाज समितीच्यावतीने गोंदिया बंदची आज हाक देण्यात आली.
सुदर्शन समाजातील नागरिक शहरातील रस्त्यावर सकाळी ११ वाजता रस्त्यावर उतरले. या नागरिकांनी उत्तरप्रदेश सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. शहरातील सर्व दुकाने व व्यापारी आस्थापने बंद करण्याची हाक दिली आहे. हे बलात्काराचे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून आरोपींना लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी नागरिकांनी मागणी केली.
हेही वाचा-'उत्तर नाही तर अत्याचार प्रदेश' : जन्मदात्याचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडित गर्भवती
दु:खाच्या प्रसंगी पीडितेच्या कुटुंबीयांच्या वेदनेवर फुंकर घालण्याची गरज असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी परस्पर पीडितेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. तेव्हा मुलीच्या कुटुंबियांना घरात डांबून ठेवण्यात आले होते. तर पीडीतेच्या कुटुंबीयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम पोलिसांनी केले आहे. तेव्हा पोलिसांवरही कारवाई करण्यात यावी, या मागण्याचे निवेदन सुदर्शन समाज समितीने उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले. यावेळी काढण्यात मोर्चात सामाजिक कार्यकर्ता सुनील भरणे व सामाजिक कार्यकर्ता संतोष सागरे यांच्यासह शेकडो तरुण-तरुणी सहभागी झाले होते. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांचा शहरात चोख बदोबस्त ठेवण्यात आला होता.
हेही वाचा-हाथरस सामूहिक बलात्कार : राहुल-प्रियांका घेणार पीडित कुटुंबीयांची भेट, हाथरसरकडे रवाना