गोंदिया - रेल्वे स्थानक परिसरातून मोटारसायकल चोरी करणाऱया दोघांना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. सुरक्षेकरिता तयार करण्यात आलेले विशेष आरपीएफ पथक व जीआरपी गोंदिया यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. यात दोन चोरांना सहा मोटारसायकलींसह अटक करण्यात आली आहे.
प्रीतम प्रेमचंद झाडे यांनी 10 एप्रिल रोजी रेल्वे पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार प्रीतम झाडे हे 10 एप्रिलला आपल्या पाहुण्यांना सोडायला रेल्वे स्थानकात आले. त्यानंतर अवघ्या काही मिनिटातच त्यांनी उभा केलेल्या जागेवर त्यांची मोटारसायकल नसल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी रेल्वे पोलिसांकडे याची तक्रार नोंदवली. त्यानंतर लगेच अलर्ट टास्क टीमद्वारे याबाबतची सूचना जवळील सर्व जीआरपी ठाण्यांना करण्यात आली. तसेच जवळील परिसरात याकरिता शोधमोहीम हाती घेण्यात आली.
यातील एका पथकाने रेल्वे स्थानकाबाहेरील सीसीटीव्ही फुटेज पाहून गाडी क्रमांक आपल्या सहकाऱ्यांना सांगितला व तपासचक्र आपल्या खबऱ्यांच्या मदतीने चालविले असता 12 एप्रिलला रात्री 12.30 वाजताच्या सुमारास रेल्वे स्थानकाजवळील परिसरात श्री टॅाकीज चौकातील दारू दुकानाजवळ दोन संशयित मोटारसायकल बजाज प्लॅटीना (क्रमांक एम.एच.35 क्यू. 9130) या गाडीला धक्का मारुन पुढे ढकलून नेत असताना आढळले. त्यांची विचारपूस केली असता पोलिसांना समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पोलिसांनी पोलीसी खाक्या दाखवल्यानंतर ही मोटारसायकल चोरीची असल्याची कबुली त्यांनी दिली.
दिनेश चौधरी (वय 30) व सोमेश चिंतामन बागडे (वय 34 रा.दोन्ही अंभोरा ता.गोंदिया) असे अटक करण्यात आलेल्या चोरांची नावे असून त्यांच्याकडून 6 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या दोघांवर गोंदियासह विदर्भातील अनेक ठिकाणी विविध गुन्हे दाखल आहेत.