गोंदिया - गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत दारूबंदी गाव खमारी येथे मंदिर परिसरात आज २५ जुलै रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास दारूने भरलेली बॅग आणि बॉक्स परिसरातील नागरिकांना दिसून आला. दारूबंदी महिला समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ८ दिवसांपूर्वीच अवैध दारू विक्रेत्यांना पकडले होते. दारूबंदी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अवैध दारू ताब्यात घेतली आहे.
उल्लेखनीय म्हणजे, लॉकडाउनमध्ये दारूबंदी गावांत अवैध दारूचा व्यवसाय जोमात सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोन वर्षापूर्वी खमारी गावामध्ये परवानाधाकर दारू दुकान निवडणूक घेवून बंद करण्यात आले होते. दारूबंदी महिला समिती स्थापन करण्यात आली होती. पण त्याचा काही लाभ झाला नाही. जेव्हापासुन दुकान बंद करण्यात आले. तेव्हापासुन अवैधरित्या लपून छपून दारू विक्री करण्याचे व्यवसाय सुरू झालेला आहे. दारूबंदी महिला समितीच्या सदस्यांनी ६ दिवसांपूर्वीच अवैध दारूसोबत गावातीलएका व्यक्तीला रंगेहात पकडण्यात आले होते.
आज २५ जुलै रोजी नागपंचमीच्या दिवशी गावातील गोसाईदेव बाबा देवस्थान मंदिर परिसरात संशयितरित्या देशी दारूचा बॅग दिसून आली. माहिती मिळताच दारूबंदी महिला समितीच्या सदस्यांनी घटनास्थळावर जाऊन दारूने भरलेली दारूची बॅग व बॉक्स आपल्या ताब्यात घेतले. याची माहिती पोलिसांनी दिली असता पोलिसांनी घटना स्थळी पोहोचून पंचनामा करून अज्ञात व्यक्ती विरूद्ध गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अशाच प्रकारे जिल्ह्यात अनेक दारूबंदी गावात अवैधरित्या दारू विक्रीचा व्यवसाय जोमात सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.