गोंदिया - कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा मोठ्या प्रमाणात फटका जिल्ह्यातील बागायती शेतीला बसला आहे. सडक-अर्जुनी तालुक्यात ५०० हेक्टरवर वेलवर्गीय शेती करण्यात येते. त्यात प्रामुख्याने टरबूज, डांगरू, काकडी, कोहळा पिके घेण्यात येतात. मात्र, लॉकडाऊनमुळे मजूर मिळत नाहीत; त्यातच वाहतुक बंद असल्याने शेतातील माल बाजारपेठेत जात नाहीय. परिणामी पाचशे एकरातील कोट्यवधी रुपयांचा माल शेतात सडत आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या आर्थिक संकटात वाढ झाली आहे.
जिल्ह्यात प्रामुख्याने धानाचे पीक घेण्यात येते. याचसोबत शेतकरी वेलवर्गीय शेतीसुद्धा करतात. यावर्षी जिल्ह्यात ५०० हेक्टरवर वेलवर्गीय शेती करण्यात आली आहे. यामध्ये शेतकर्यांनी टरबूज, डांगरू, काकडी, कोहळा पिकाची लागवड केली आहे. गेल्या काही दिवसांपासून दर चार दिवसांनी पाऊस येत असल्यामुळे टरबूज व डांगरू पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. बाजारपेठा बंद असल्याने फळांना मागणी नाही. यामुळे पीक शेतातच आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊन देखील कडक करण्यात आले आहे. बियाणे आणि औषधांचा खर्च काढणे देखील अवघड झाल्याने जगण्याचा प्रश्न शेतकर्यांसमोर आहे.
ऐन उन्हाळ्यात काकडीची मागणी घटली
ऐन उन्हाळ्यात काकडीची विक्री वाढते. अनेक लग्नकार्य तसेच मोठ्या हॉटेलमध्ये काकड्यांची मागणी वाढते. पण लॉकडाऊन असल्यामुळे लग्नकार्य तसेच अन्य कार्यक्रमांना देखील खीळ बसलीय. काकडी, मिरचीची विक्री होत नसल्याने शेतकर्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
धानासोबतच नगदी पीक म्हणून वेलवर्गीय पिकांची पाचशे हेक्टर क्षेत्रात लागवड केली आहे. मात्र, यंदा कोरोनामुळे जिल्ह्यातील शेतकर्यांची परिसस्थिती आणखी खालावली. उत्पादन खर्चही निघणे कठीण झाल्याने शेतकऱ्यावरच उपासमरीची वेळ आलीय. कोरोनाच्या सावटात सापडलेल्या गोरगरीबांना सरकार आणि लोक प्रतिनिधींकडून मदत मिळत आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे कोट्यवधी रूपयाचे नुकसान झालेल्या शेतकर्यांना भरपाई मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.