गोंदिया - जिल्ह्यामध्ये तापमानात विक्रमी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात शुक्रवारी 6.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे गोंदिया जिल्हा हा विदर्भातील सर्वात थंड जिल्हा ठरला आहे. काही दिवसांपूर्वी ढगाळ वातावरणामुळे तापमान वाढले होते. मात्र आता पुन्हा एकदा तापमानात घट होऊन थंडी वाढली आहे.
थंडीपासून बचावासाठी शेकोट्यांचा आधार
तापमान एका दिवसात 2.7 अंश सेल्सिअसने कमी झाल्यामुळे थंडी वाढली आहे. शुक्रवारी जिल्ह्यात 6.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, गोंदिया हा विदर्भातला सर्वात थंडा जिल्हा ठरला आहे. दरम्यान पुढील दोन ते तीन दिवस थंडीची लाट कायम राहाणार असल्याचा इशारा हवामान खात्याच्या वतीने देण्यात आला आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी ठिकठिकाणी नागरिकांनी शेकोट्या पेटवल्याचे चित्र आहे. गोंदियामध्ये जंगलाचे प्रमाण अधिक असल्यामुळे दिवसभर देखील थंड वातावरण असते, थंडी वाढत असल्यामुळे नागरिक घराच्या बाहेर पडणे टाळत आहेत.