गोंदिया - सडक अर्जुनी तालुक्यातील डूगिपार येथे मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यातून तसेच इतर जिल्ह्यातून गोवंश तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे अनेकदा समोर आले आहे. या गोवंशांना वाहनात टाकून सडक अर्जुनी तालुक्यातून त्यांची वाहतूक केली जाते. अशीच एका वाहनातून काही गोवंशाची वाहतुक होत असल्याची माहिती बजरंग दलाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना मिळाली. त्यांनी पांढरी-कोसमतोंडी मार्गाने जात असलेल्या सदर वाहनाला थांबवून पोलिसांना याची माहिती दिली.
एका पिकअप गाडीतून (क्रमांक एम.एच. 36-एफ 1956) 12 गोवंश कत्तलीसाठी नेत असल्याचे त्यांना आढळून आले. पांढरी येथील रेल्वे क्रॉसिंगवर ही गाडी अडवण्यात आली. त्यानंतर हे वाहन डुग्गीपार पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले.
हेही वाचा... 'प्रेमाचं प्रतिक' असलेल्या सारस पक्ष्याच्या गणनेला सुरुवात; फक्त गोंदियातच उरले अस्तित्व
पोलिसांनी सदर वाहनाची तपासणी करून त्यात सहा गायींसह एकूण 12 गोवंश निर्दयतेने कोंबलेले आढळले. या बाराही जनावरांना मुक्त करून त्यांची जोपासना करण्याकरता चिचगाव येथील कामधेनु गोशाला गौ अनुसंधान केंद्रात पाठवले आहे.
तक्रारदार जगदीश्वर बिसेन यांच्या तक्रारीवरून वाहन चालक आकाश मुलचंद गडकरी (19) आणि राजा (वय 30) यांच्यावर प्राण्यांची निर्दयतेने वाहतूक कायदा, महाराष्ट्र पशुसंवर्धन कायदा आणि मोटार वाहन कायदा या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.