गडचिरोली - विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी खासदार खासदार अशोक नेते यांनी गडचिरोली-चामोर्शी-आष्टी या राष्ट्रीय महामार्गाचे शुक्रवारी भूमीपूजन केले. मुसळधार पावसामुळे गडचिरोली-चामोर्शी-आष्टी या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी अनेक अपघात घडले आहेत. या राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी मिळूनही गेल्या दोन महिन्यांपासून रस्त्याची अशी अवस्था होती. ऐन विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या तोंडावर रस्त्याचे भूमीपूजन केल्याने खासदार नेतेंवर टीका होत आहे.
गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौक ते विज्ञान महाविद्यालयापर्यंतचा रस्ता पूर्णता: खड्डेमय झाला आहे. शुक्रवारी सकाळी या रस्त्यावरून मालवाहू ट्रॅक्टर जात असताना खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात ट्रॉली उलटली. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून शहरवासीय संताप व्यक्त करीत होते. एक-दोनदा रस्त्यावर खडी टाकून डागडुजी करण्यात आली. मात्र, थातुरमातुर डागडुजीमुळे रस्त्याची अवस्था आणखी बिकट बनली. त्यामुळे अनेक वाहतूकदारांनी प्रवासाचा मार्गच बदलला. आज ना उद्या, रस्त्याची दुरुस्ती होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, खासदार नेते यांनी आचारसंहितेच्या तोंडावर राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे भूमिपूजन केल्याने ते टीकेचे धनी ठरले आहेत.
हे ही वाचा - गडचिरोलीतून सीआरपीएफच्या 10 कंपन्या हटवल्या; निवडणुकीत पोलिसांवरील ताण वाढणार
राष्ट्रीय महामार्ग गडचिरोली ते विज्ञान महाविद्यालयापर्यंत सिमेंट काँक्रीट राहणार आहे. विज्ञान महाविद्यालय ते शिवणीपर्यंत डांबरी रस्ता राहील. शिवणी ते चामोर्शीपर्यंत काँक्रीटचे बांधकाम होईल. चामोर्शी ते आष्टीपर्यंत पुन्हा डांबरी रस्ताच राहणार आहे. येनापूरजवळ तीन किमी अंतराचे सिमेंट काँक्रीटचे बांधकाम होईल. काही भागात जंगल असल्याने शासन निर्णयानुसार सिमेंट काँक्रीट ऐवजी डांबरचे रोड तयार केले जाणार आहे. काम तत्काळ सुरू करून ८ ते १० महिन्यात जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना खासदार अशोक नेते यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अभियंत्यांना दिल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग जिल्हा विकासामधील दुवा ठरेल, असे मत अशोक नेते यांनी केले. याप्रसंगी नगराध्यक्ष योगीता पिपरे, राष्ट्रीय महामार्गाचे उपविभागीय अभियंता आशिष आवळे, शाखा अभियंता दीपक आंबुलकर, कनिष्ठ अभियंता लंजे, औरंगाबादच्या एजी कॉन्ट्रॅक्टर्सचे किशोर गायकवाड आदी उपस्थित होते.
हे ही वाचा - धक्कादायक! बनावट धनादेश बनवून गडचिरोली जिल्हा परिषदेच्या खात्यातून 2 कोटी 86 लाख लंपास