गडचिरोली - जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील जारावंडी पोलीस मदत केंद्रांतर्गत सीनभट्टी जंगलात नक्षलवादी आणि नक्षल विरोधी अभियान पथकामध्ये आज (शनिवार) दुपारी चकमक उडाली. या चकमकीत एका महिला नक्षलीस ठार करण्यात पोलिसांना यश आले आहे. महिला नक्षलीचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून अजूनही या जंगल परिसरात शोधमोहीम सुरू आहे. हा भाग पेंढरी पोलीस उपविभागांतर्गत येतो.
आज (शनिवार) दुपारी 3 ते 3:30 वाजण्याच्यादरम्यान नक्षल अभियानावर तैनात पथक मोहीम राबवित होते. तेव्हा दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल सी-60 च्या कमांंडोंनीही गोळीबार केला.
दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार करण्यात येत होता. मात्र, पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलींनी जंगलात धूम ठोकली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा शोध घेतला. तेव्हा घटनास्थळावर एका महिला नक्षलीचा मृतदेह सापडला. दरम्यान, अद्याप त्या महिला नक्षलीची ओळख पटलेली नाही.
हेही वाचा - 'अन्नपूर्णा आपल्या दारी': गडचिरोली शहरातील गरजूंना दररोज ५ रुपयात फिरत्या गाडीतून जेवण
हेही वाचा - गडचिरोली पोलीस दलाकडून जांभूळखेडा घटनेतील हुतात्मा जवानांना श्रद्धांजली