गडचिरोली - परिसरातील दारूविक्री बंद करावी यासाठी शहारातील लांजेडा वार्ड येथील महिलांनी चक्क दारू विक्रेत्यांच्या घरासमोर ताट वाजवा आंदोलन केले. त्यामुळे माहिलांची ही गांधीगिरी सर्वत्र चर्चेचा विषय ठरली. विशेष म्हणजे कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता सुरक्षित अंतर पाळून गटागटाने विक्रेत्यांच्या घरासमोर महिलांनी हे अनोखे आंदोलन केले.
शहरातील लांजेडा वार्ड परिसरात अनेकजण दारूची मोठ्या प्रमाणात विक्री करतात. परिणामी परिसरात सतत पुरुषांची गर्दी असते. अनेक ठिकाणी रस्त्यावरच दारू विकली जाते. रात्रीला तर लोक रस्त्यावरच दारू पितात. याचा त्रास या भागातील लोकांना व खास करून महिलांना व तरुणींना सोसावा लागतो. त्यामुळे या भागातील महिलांनी मुक्तिपथ अभियानाच्या सहकार्याने वार्ड संघटन तयार करून दारू विक्रेत्यांना आव्हान दिले. अनेक अहिंसक कृती करून दारू उद्ध्वस्त केली. दारू साठे नष्ट केले. काही विक्रेत्यांविरुद्ध गुन्हाही दाखल झाला. काहींना शिक्षा, तर अनेकांवर दंडात्मक कारवाई झाली.
पोलीस व जिल्हा प्रशासनाला विक्रेत्यांविरोधात अनेकदा निवेदनेही देण्यात आली. तरीही मुजोर विक्रेते ऐकत नसल्याने दारूविक्रेत्यांविरोधात ठाम उभ्या असलेल्या महिलांनी त्यांच्या घरासमोर जाऊन ताट वाजवा आंदोलन केले. सात ते आठ विक्रेत्यांच्या घरासमोर ताट वाजवून माहिलांनी दारू विक्री बंद करण्याची मागणी केली. महिलांनी पुकारलेला हा गांधीगिरीचा मार्ग शहरात चर्चेचा विषय होता.