नाशिक : दिंडोरी लोकसभ मतदार संघाचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचं आज सकाळी दुःखद निधन झालं. त्यांच्या निधनाची माहिती दिंडोरी लोकसभा मतदार संघात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त करण्यात आला. त्यानंतर ठिकठिकाणी माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या कार्याबद्दल चर्चा ऐकावयास मिळाल्या. हरिश्चंद्र चव्हाण यांची गेल्या काही दिवसांपासून प्रकृती बरी नव्हती. त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी पाटील गल्ली क्रमांक 4 कॉलेज रोड, नाशिक या त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे.
भारती पवारांचा केला होता दणक्यात पराभव : हरिश्चंद्र चव्हाण यांनी 2009 आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला. लोकसभा निवडणूक 2014 मध्ये त्यांनी माजी खासदार भारती पवार यांचा मोठ्या फरकानं पराभव केला. भारती पवार त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढल्या. दरम्यान 2019 मध्ये भारती पवार भाजपामध्ये आल्या. त्यानंतर भाजपानं हरिश्चंद्र चव्हाण यांची उमेदवारी नाकारून भारती पवार यांना उमेदवारी दिली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भारती पवार यांनी मोठ्या फरकानं विजय मिळवला. भाजपानं भारती पवार यांना उमेदवारी दिली, त्यानंतरही हरिश्चंद्र चव्हाण हे भाजपाशी एकनिष्ठ राहिले.
मालेगाव आणि दिंडोरीचं प्रतिनिधीत्व : मालेगाव आणि नंतर दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे खासदार म्हणून त्यांनी अनेक वर्षे प्रतिनिधित्व केलं. पंचायत समिती, जिल्हा परिषद, इथंही त्यांनी पदं भूषवली. दिंडोरीचे खासदार असताना भाजपाचं सरकार वाचवण्यासाठी एयर अॅब्युलन्सनं त्यांनी दिल्ली गाठली आणि मतदान केलं. भाजपाशी एकनिष्ठ असलेले चव्हाण यांना 2019 च्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपानं तिकीट दिलं नव्हतं. मात्र तरीही ते भाजपात राहून काम करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी कलावती चव्हाण, एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनानं दिंडोरी लोकसभा मतदारसंघावर शोककळा पसरली आहे.
हेही वाचा :
- 'डॉ भारती पवार या आम्हाला धमकावतात'; भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्षांचे गंभीर आरोप, पदाचाही दिला राजीनामा - Dr Bharati Pawar
- Narahari Jirwal : नरहरी झिरवाळ नॉट रीचेबल; दिंडोरी तालुक्यात लागले दादांचे शुभेच्छा फलक..
- Nagar Panchayat Result : केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना धक्का.. देवळा, सुरगाणात भाजपचा गुलाल