गडचिरोली - कुरखेडा परिसरात नक्षलवाद्यांनी 1 मे ला केलेल्या हल्ल्यात 15 जवानांना वीरमरण आले. मात्र आता नक्षलवाद्यांनी, हा घातपात घडवण्यासाठी माहिती देणाऱ्या खबऱ्याचे आभार मानल्याचा मजकूर रोडवर लिहिल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान रोडवर लिहिलेला हा मजकूर नक्षलवाद्यांनी लिहिला, की कोणी खोडसाळपणा केला, याचा शोध पोलीस घेत आहेत.
कुरखेड्यापासून काही अंतरावर रस्त्याच्या मधोमध, "प्रफुलदादा, तुम्ही दिलेल्या माहितीप्रमाणे कुरखेडा बॉम्बस्फोट सक्सेस झाला. असेच आम्हाला माहिती देत राहा, लाल सलाम", असा मजकूर लिहिला आहे. मुळात, पोलीस असोत की नक्षलवादी, आपल्या खबऱ्याची माहिती अशा रितीने कधीच जाहीर करीत नाहीत. उलट दोन्ही बाजुंनी ती शक्य तेवढी गोपनीय ठेवली जाते. पोलीस आणि नक्षवाद्यांच्या कारवाया या खबऱ्याने दिलेल्या टीपवरच अवलंबून असतात. अशा स्थितीत रस्त्यावर लिहिलेला हा मजकूर खोडसाळपणाच अधिक वाटतो. गावातील विरोधकांना टार्गेट करण्यासाठी केलेला हा उपद्व्याप असल्याचे बोलले जात आहे. याबाबत कसून तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
महाराष्ट्र दिनाच्या पहाटे कुरखेडा तालुक्यातील दादापूर येथे 27 वाहनांची नक्षलवाद्यांनी जाळपोळ केली होती. या घटनेचा तपास करण्यासाठी जात असलेल्या पोलिसांच्या वाहनाला लक्ष्य करून भूसुरुंगस्फोट घडवण्यात आला. या स्फोटात 15 पोलीस जवानांसह एका खासगी वाहन चालकाला वीरमरण आले आहे.