गडचिरोली - तेंदूपाने वाहून नेणारा ट्रक नियंत्रण सुटल्याने पुलावरून वैनगंगा नदीत कोसळल्याची घटना आज रविवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास आष्टी येथे घडली. या अपघातामध्ये चालक व क्लीनर दोघेही जागीच ठार झाले आहेत, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
दोघांचा मृत्यू, एक जखमी
नितीन दीपक बिके (३२), कालू सतविंदरसिंह सलुजा (२५) दोघेही रा. किसाननगर, ता.सावली, जि.चंद्रपूर अशी मृतांची नावे आहेत. अजय कारपेनवार, रा. बल्लारपूर हा या अपघातात जखमी झाला आहे. एमएच ३४ बीजी ६१११ क्रमांकाचा ट्रक तेंदूपाने घेऊन, आलापल्ली येथून बल्लारपूरकडे जात होता. रविवारी पहाटे आष्टी येथे पोहोचताच वनविभागाच्या नाक्यावर कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर ट्रक पुढे गेला. त्यानंतर जवळच असलेल्या वैनगंगा नदीच्या पुलावरून ट्रक नदीपात्रात कोसळला. यात ट्रकचालक नितीन बिके व क्लीनर कालू सलुजा हे जागीच ठार झाले, तर अजय कारपेनवार हा जखमी झाला. पोलिसांनी अजयला आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले आहे. आष्टी पोलीस घटनेचा तपास करीत आहेत.
हेही वाचा - आमच्या रक्तामध्येच शौर्य; आम्हाला नक्षलवाद्यांचा फुकटचा सल्ला नको - मराठा संघटना