गडचिरोली - पुणे येथील सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीत मास कम्युनिकेशनच्या अंतिम वर्षाला शिकत असलेली विद्यार्थिनी समिधा कालीदास राऊत (वय 20 वर्षे) ही बुधवारी (दि. 1 एप्रिल) रात्री गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. समिधा ही गडचिरोली येथील मूळ रहिवासी असून हिवताप विभागात कार्यरत कालीदास राऊत यांची कन्या, तर ज्येष्ठ पत्रकार रोहिदास राऊत यांची पुतणी आहे. ती अभ्यासात हुशार होती. पण, ही घटना अचानक घडल्याने तिच्या मृत्यूबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.
समिधा ही पुणे येथील सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीत मास कम्युनिकेशनच्या अंतिम वर्षात शिकत होती. पुण्यतील विमाननगर येथील सिम्बॉयसिस गर्ल्स होस्टेल मधील रोहिल मिथील इमारतीच्या खोलीत ती राहत होती. 1 एप्रिलच्या रात्री दैनंदिन हजेरीच्या वेळी समिधा उपस्थित न झाल्याने त्याची चौकशी केली. त्यावेळी तिच्या खोलीचे दार बंद असल्याने वसतिगृहाच्या व्यवस्थापनाने बाल्कनीच्या बाजूला असलेल्या पॅनलमधून खोलीत प्रवेश केला. तेव्हा समिधा खोलीतील पंख्याला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आली. वसतिगृहाच्या कर्मचाऱ्यांनी तिला खाली उतरविले. त्यानंतर डॉक्टर व पोलिसांना पाचारण केले. तेव्हा तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
पोलिसांनी समिधाचा मृतदेह ताब्यात घेऊन पुणे येथील ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. समिधा राऊत ही अतिशय हुशार विद्यार्थिनी होती. तिचा मृत्युबद्दल शंकाकुशंका व्यक्त केल्या जात असून, मृत्यूच्या नेमक्या कारणाचा शोध घेणे अपरिहार्य झाले आहे. गुरुवारी (दि. 2 एप्रिल) पहाटे समिधाचे कुटुंबीय पुण्याला रवाना झाले. आज शुक्रवारी संध्याकाळपर्यंत ते समिधाचा मृतदेह घेऊन गडचिरोलीत पोहचतील, असे त्यांच्या कुटुंबीयांतर्फे सांगण्यात आले.
हेही वाचा - सिरोंचाची मिरची नागपूरच्या बाजारात; शेतकऱ्यांना दिलासा