गडचिरोली - अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली येथील प्राणहिता नदीत आज(1 डिसेंबर) नाव उलटल्याने ६ प्रवासी बुडाल्याची घटना घडली आहे. त्यातील ४ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून २ प्रवासी अद्यापही बेपत्ता आहेत. बानो सुरेश शंकर नायक बानो (वय २७ जि. आसिफाबाद) आणि मुंजम बाळकृष्णम (वय २५ जि. कागजनगर) अशी बेपत्ता व्यक्तींची नावे आहेत. ते तेलंगणा राज्यात वनरक्षक असल्याची माहिती समोर आली आहे.
वांगेपल्ली येथील प्राणहिता नदी ओलांडल्यावर तेलंगणा राज्याची सीमा सुरु होते. नदीवर पूल नसल्याने दोन्ही राज्यातील प्रवासी नावेने प्रवास करतात. आज सकाळी वांगेपल्ली येथून एक नाव प्रवासी घेऊन तेलंगणा राज्यातील आसिफाबाद जिल्ह्याच्या दिशेने जात होती. मात्र, मध्येच नाव हेलकावे घेऊन उलटली. या अपघातात ६ प्रवासी पाण्यात बुडाले.
हेही वाचा - घोडे धुण्यासाठी नदीत उतरलेल्या सख्ख्या भावांचा मृत्यू; खोलीचा अंदाज न आल्याने बुडाले
घटनेची माहिती मिळताच तेलंगणा आणि गडचिरोली जिल्ह्याचा आपत्ती निवारण चमू व पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी ४ जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढले. त्यापैकी दोन जणांना गुंडेम येथील नदी काठावर, तर दोघांना वांगेपल्ली काठावर सुरक्षित पोहचवण्यात आले. अन्य दोघे अद्यापही बेपत्ता असून त्यांचा शोध सुरु आहे.