गडचिरोली - १ मे महाराष्ट्र दिनी गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा लगतच्या जांभूळखेडा येथे नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणला. या स्फोटात १५ जवान हुतात्मा झाले. या घटनेला जबाबदार धरून कुरखेडाचे माजी उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे यांना निलंबित करण्यात आले आहे. याबाबत शुक्रवारी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित झाला असता, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी त्यांना निलंबित केल्याची घोषणा केली. काळे सध्या जळगाव जिल्ह्यात कार्यरत होते.
३० एप्रिलच्या रात्री कुरखेडापासून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या दादापूर येथे राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील तब्बल २७ वाहने नक्षलवाद्यांनी पेटवून दिले. या घटनेचा तपास करण्यासाठी कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे सकाळी १० वाजताच्या सुमारास स्वतः घटनास्थळी गेले. त्यानंतर त्यांनी लगेच शीघ्र कृती दलाच्या जवानांना घटनास्थळावर बोलावून घेतले. मात्र, त्यांच्या सुरक्षेची कोणतीही खबरदारी घेतली नाही.
कुरखेडा एसडीपीओचे शीघ्र कृती दलाचे १५ जवान एका मोकळ्या खासगी वाहनाने निघाले असता, जांभूळखेडा जवळच्या लेंढारी नाल्यावर नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणत वाहन उडविले. यात खासगी वाहनचालकांसह वाहनातील पंधराही जवानांना वीरमरण आले. त्यामुळे या घटनेनंतर जिल्हा पोलीस दलावर शहीद जवानांच्या कुटुंबीयांकडून अनेक आरोप झाले. तर जवानांना घटनास्थळी बोलावणारे शैलेश काळे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून त्यांच्या निलंबनाची मागणी कुटुंबीयांनी केली.
मात्र, त्यांचे निलंबन न करता घटनेच्या पंधरा दिवसानंतर जळगाव जिल्ह्यात जात पडताळणी विभागात त्यांची बदली करण्यात आली. त्यानंतरही हे प्रकरण थांबले नाही. कुटुंबीयांनी सतत त्यांच्या निलंबनाची मागणी केल्याने सरकारने नमते घेत शुक्रवारी त्यांना निलंबित केल्याची घोषणा विधान परिषदेत गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केली.