गडचिरोली - 26 जून बुधवारला विदर्भातील शाळांची पहिली घंटा वाजणार आहे. शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांच्या स्मरणात राहावा, त्यांना वर्षभर शाळेची गोडी रहावी, यासाठी प्रशासनाकडून विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. गडचिरोली जिल्हा परिषदेने यासाठी अनेक कार्यक्रम आखले आहेत. जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये तब्बल 14 हजार 300 विद्यार्थी पहिल्या वर्गात दाखल होणार आहेत.
पहिली ते आठवी पर्यंतचे 1 लाख 16 हजार विद्यार्थी दाखल होणार आहेत. सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप केले जाणार असल्याची माहिती गडचिरोली जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी मुनघाटे यांनी दिली. विदर्भात उन्हाचा पारा जास्त असल्याने विदर्भातील सर्व शाळा दरवर्षी 26 जून रोजी सुरू होतात. शाळेचा पहिला दिवस नवगतांचे स्वागत व पुस्तक दिन म्हणून शाळांमध्ये साजरा केला जात असल्याने तशी तयारी मंगळवारपासूनच शाळांमध्ये सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळांसह विविध खाजगी अनुदानित अशा पहिली ते आठवीपर्यंतच्या 1 हजार 899 शाळा आहेत. या शाळांमध्ये 1 लाख 16 हजार 910 विद्यार्थी दाखल होणार आहेत.
शाळेत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके वाटप केली जाणार. सर्व शाळांमध्ये यापूर्वीच तब्बल 6 लाख 34 हजार 886 पाठ्यपुस्तके पोहोचविण्यात आली आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी गावातून प्रभात फेरी, विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत, गोड जेवण, पाठ्यपुस्तकांचे वाटप असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी कोणतेही विद्यादान न करता खेळीमेळीच्या वातावरणात प्रवेशोत्सव साजरा केला जाणार आहे. या प्रवेश उत्सवासाठी शाळा व्यवस्थापन समितीसह गावातील पुढारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार यांच्यासह प्रशासनातील अधिकारीही स्वतः सहभागी होणार आहेत.
अशी आहे तालुकानिहाय विद्यार्थी संख्या
अशी आहे तालुकानिहाय विद्यार्थी संख्या
गडचिरोली - 159 1582
आरमोरी - 130 1217
देसाईगंज - 68 1018
कुरखेडा - 168 1124
कोरची - 132 685
धानोरा - 211 1180
चामोर्शी - 253 2447
मुलचेरा - 89 638
अहेरी - 231 1620
एटापल्ली - 211 1400
भामरागड - 100 600
सिरोंचा - 147 749
एकूण - 1899 14313