गडचिरोली - सिरोंचा तालुक्यापासून ५ किमीवर असलेल्या नगरम गावातील सम्मक्का देवी कल्याण महोत्सव व (बोनालु) कलश शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले. ही तीन दिवसीय यात्रा गावातील समक्का मंदिरात मंदिरात पार पडली. यात्रेदरम्यान नवस पूर्ण झालेल्या भाविकांनी आपल्या कुटूंबासमवेत सम्मक्का देवीच्या कल्यण महोत्सवात सहभागी होऊन नवस फेडला. यात सिरोंचा, अहेरी, भामरागडसह शेजारच्या तेलंगाणा राज्यातील भाविकही मोठ्या संख्येने भक्तीभावाने सहभागी झाले होते. कल्याण महोत्सवानंतर शेवटच्या दिवशी कलश प्रदक्षिणेनंतर जत्रेची सांगता करण्यात आली.
जिल्हा सीमेवर सिरोंचा तालुका मुख्यालयापासून ५ कि.मी अंतरावर असलेल्या नगरम गावात सम्मक्का देवी महोत्सव उत्साहात पार पडला. या ३ दिवसीय महोत्सवात नवस फेडणाऱ्या भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. नगरम गावात गेल्या 42 वर्षांपासून ही यात्रा सुरू आहे. येथे सन १९८०-८१ दरम्यान पानेम बक्कम्म नामक महिलेच्या अंगात देवी येण्यास सुरुवात झाल्याचे सांगितले जाते. देवीकडे मगितलेले मागणं पूर्ण होते, अशी भाविकांची श्रद्धा होती. त्यामुळे दरवर्षी भाविकांच्या संख्येत वाढ होत गेली आणि त्याला जत्रेचं स्वरुप प्राप्त झाले. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेत नागरिकांनी या ठिकाणी मंदिर बांधण्याचे ठरविले. यासाठी गावातील जागरी मल्लय्या यांनी आपल्या शेतात मंदिरासाठी जागा दान दिली. तसेस गावातील काही प्रतिष्ठित लोकांनी मदत पुरवत मंदिराचे काम पूर्ण केले. तेव्हापासून दरवर्षी येथे यात्रा भरत असते.
हेही वाचा - आमदार डॉ. होळी यांची आमदारकी वैध; सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब
यावर्षी यात्रेत भाविकांसाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. रात्रभर मनोरंजनसाठी अरडा ग्रा.पं. चे सरपंच बापन्ना रंगुवार यांच्या सौजन्याने तेलुगुभाषीक पेध्दपल्ली येथील कलापथक ओग्गु कथेची आयोजन करण्यात आले. गुड आणी तांदूळ शिजवलेले नैवेद्य कलश(तेलुगु भाषेत बोनम महणतात) घेऊन सर्व महिला पुरुषांनी मंदिराभोवती ३ प्रदक्षिणा घातल्या. त्यानंतर प्रत्येक कुटुंबांने दर्शन घेऊन देवीला नेवैद्य चढवला आणि खीर वाटून जत्रेची सांगता करण्यात आली. जत्रेचे आयोजन व यशस्वीतेसाठी पोलीस पाटील कंबगोनी व्यंकटस्वामी, उपसरपंच कंबगोनी राजबापू, बोल्ले शंकर, गौरारपु सुरेश, पल्ले राजन्ना, कोतवडला रामय्या, कंबगोनी वेंकटेश्वरराव, जुट्टु बापू, गग्गुरी बानय्या, वेनमपल्ली चंद्रय्या, बत्तुला संपत यांनी पुढाकार घेतल्याचे मंदिराचे प्रधान पुजारी पुनेम भक्कम्मा, पोलीस पाटील व्यंकटस्वामी यांनी दिली.