गडचिरोली- विजयादशमीच्या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्याची परंपरा आहे. मात्र दुसरीकडे राजा रावणाच्या शौर्याची गाथा गात पुजन करण्याची परंपरा गडचिरोली जिल्ह्यातील काही आदिवासी गावांत जोपासली जाते. विजयादशमीला मोठ्या आदरभावाने या गावांमध्ये आदिवासी बांधव रावण महोत्सव साजरा करतात. मात्र यावर्षी कोरोना महामारीमुळे मिरवणुकीला फाटा देत श्रद्धापूर्वक रावणपूजा पार पडली.
हेही वाचा-महावितरणचा गलथान कारभार; मजुराला पाठवले ६१ हजार ४८० रुपयांचे बिल
धानोरा तालुक्यातील परसवाडी, दुधमाळा, धानोरा, कन्हाळगाव, रांगी, येरकडटोला, महावाडा, आरमोरी तालुक्यातील वानरचुवा आदी प्रमुख गावांसह इतर काही लहान गावांमध्ये विजयादशमीच्या दिवशी रावण महोत्सव उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी आदिवासी बांधव राजा रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गावातुन मिरवणूक काढतात. त्यानंतर प्रतिष्ठापणा करून पारंपारीक पुजा केली जाते. विशेष म्हणजे याप्रसंगी अर्जी म्हणजेच प्रार्थना केली जाते.
१९९१ मध्ये राजा रावणाच्या मूर्तीची केली स्थापना
राजा रावणाप्रती असलेल्या श्रध्देतुन धानोरा तालुक्यातील परसवाडी दुधमाळा येथे १९९१ मध्ये राजा रावणाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. या गावात दरवर्षी विजया दशमीच्या दिवशी रावण महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शुर-पराक्रमी राजा रावणाला आदिवासी साहित्यात पुजनीय स्थान आहे. या स्थानामुळेच आदिवासी राजा रावणाला आपले दैवत मानतात. यंदा कोरोनाच्या संसर्गामुळे मिरवणूक रद्द झाली असली तरी रावणपूजा मात्र मनोभावे पार पडली.
हेही वाचा- दसऱ्यानिमित्त विसापूर गडावर बंजरंग दलाच्यावतीने शस्त्रपूजन