गडचिरोली - सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेली परिस्थिती व वाढत्या कोरोनाची रुग्णसंख्या अधिक आहे. या पिरिस्थितीचा विचार करता, पवित्र रमजान ईद सर्व मुस्लीम बांधवांनी अत्यंत साधेपणाने साजरी करावी. तसेच शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी मुस्लिम बांधवांना केले आहे. यावर्षी १३ एप्रिल २०२१ पासून पवित्र रमजान महिन्याचा प्रारंभ होत आहे. १३ किंवा १४ मे २०२१ (चंद्रदर्शनावर अवलंबून) रोजी रमजान ईद (इद उल फित्र) साजरी केली जाणार आहे.
धार्मिक कार्यक्रम घरीच साजरे करावेत
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सर्व मुस्लिम बांधवांनी आपले सर्व धार्मिक कार्यक्रम आपल्या घरातच साजरे करत, 'ब्रेक द चेन' या आदेशाचे पालन करावे. नमाजसाठी मशिदीत तसेच मोकळ्या जागेत एकत्र येऊ नये. रमजान ईद निमित्ताने महानगरपालिकेने तसेच स्थानिक प्रशासनाने साहित्य खरेदीसाठी वेळेचे बंधन घालून दिलेले आहे. या सर्व नियमांचे पालन करावे. तसेच दिलेल्या वेळेशिवाय बाजारामध्ये गर्दी करु नये. कोरोना या विषाणूच्या वाढत्या संसर्गास प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने राज्यात कलम १४४ लागू आहे. या संचारबंदीच्या कालावधीत फेरीवाल्यांनी रस्त्यावर स्टॉल लावू नयेत. तसेच नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये, असेही जिल्हाधिकारी सिंगला आपल्या आदेशात म्हणाले आहेत.
मिरवणुका काढू नयेत
रमजान ईद निमित्ताने कोणत्याही प्रकारे मिरवणुका, अथवा राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. धार्मिक स्थळे बंद असल्याने मुस्लिम समाजातील धर्मगुरू, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि स्वयंसेवी संस्थांनी ईद साधेपणाने साजरी करावी. रमजान ईदच्या दिवशी सर्वांनी नियमांचे पालन करत, मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा. तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे पालन करावे. दरम्यान, या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष रमजान ईदच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचेदेखील पालन करणे बंधनकारक आहे, असेही सिंगला आपल्या आदेशात म्हणाले आहेत.
हेही वाचा - मनसेचा कोविड वॉर रुमसाठी पुढाकार; अमित ठाकरेंकडून पाहणी
हेही वाचा - राज्यातील 18 ते 44 वयोगटातील लसीकरण तूर्तास थांबवले - आरोग्यमंत्री