गडचिरोली - ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना रविवारी (दि.१७नोव्हें)ला बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे उपाध्यक्ष बिल गेट्स यांच्या हस्ते लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रविवारी सायंकाळी नवी दिल्ली येथील आयसीएमआर सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य सेवेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना बिल गेट्स यांच्या हस्ते गौरवण्यात आले. यामध्ये डॉ. प्रकाश आमटे, डॉ. सायरस पूनावाला, डॉ. किरण मझूमदार-शॉ यांचा समावेश आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भामरागड तालुक्यात हेमलकसा येथे डॉ. प्रकाश आमटे यांनी 1973 मध्ये लोकबिरादरी प्रकल्पाची सुरूवात केली. तेव्हापासून भौतिक सुविधांचा अभाव असतानाही डॉ. आमटे व त्यांच्या पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे यांनी अशिक्षित व गरीब आदिवासींना आरोग्य सुविधा पुरवून त्यांना शिक्षणाची संधीही उपलब्ध करुन दिली.
लोक बिरादरी प्रकल्पामार्फत आदिवासी लोकांमध्ये असलेली अंधश्रद्धा दूर करण्यासाठी त्यांनी भरीव कार्य केले असून, यासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केले आहे.
यापूर्वी डॉ. प्रकाश आमटे यांना महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठानै ‘डॉक्टर ऑफ लिटरेचर’ (डी. लिट) पदवीने सन्मानित केले होते. 2009 मध्ये डॉ. प्रकाश आमटे यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला होता.