गडचिरोली- जिल्ह्यातील मुदत संपणाऱ्या २९१ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २९ मार्चला मतदान होत आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील अनेक तहसील कार्यालयात बुधवार आणि गुरुवारी सरपंच पदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये अनेकांचा हिरमोड झाला असला, तरी आता आरक्षण जाहीर झाल्याने ग्रामपंचायत निवडणुकीची खरी रणधुमाळी सुरू झाली आहे.
निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणूक घोषित केली. मात्र, सरपंच पदाचे आरक्षण जाहीर केले नव्हते. आरक्षण निघण्यापूर्वीच ६ मार्चपासून नामांकन दाखल करण्यास सुरुवात झाली. जिल्ह्यात निवडणूक होत असलेल्या २९१ ग्रामपंचायतीपैकी १६३ ग्रामपंचायती पेसा अंतर्गत येत असल्याने या ग्रामपंचायतीमधील सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. बिगर अनुसूचित क्षेत्रात मोडणाऱ्या १२८ ग्रामपंचायती असून त्यातील सरपंच पदाचे आरक्षण आता जाहीर झाले. १४ ग्रामपंचायती अनुसूचित जातीसाठी राखीव असून त्यापैकी ७ ग्रामपंचायतीचे सरपंच पद अनुसूचित जातीतील महिलांसाठी राखीव आहे.
बुधवारी धानोरा, सिरोंचा, देसाईगंज, कोरची, कुरखेडा, मुलचेरा व गडचिरोली या तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. तर, गुरुवारी चामोर्शी, आरमोरी, अहेरी, भामरागड, एटापल्ली तालुक्यात आरक्षण सोडत झाली. ६ मार्चपासून नामांकन दाखल करणे सुरू असले, तरी होळी व रंगपंचमीनंतरच अनेकांनी नामांकन दाखल करण्याला पसंती दिली. त्यामुळे तहसील कार्यालयामध्ये नागरिकांची गर्दी दिसून येत आहे.
हेही वाचा- वीट वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटल्याने तीन जण गंभीर