मुंबई - आज 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिन. खरतर हा दिवस महाराष्ट्रासाठी एक सुवर्णदिन आहे. मात्र, मागील वर्षी घडलेल्या एका घटनेने राज्यासाठी हा काळा दिवस झाला. गेल्या वर्षी याच दिवशी गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणला. या स्फोटात 15 पोलीस शिपाई आणि एका वाहन चालकाचा मृत्यू झाला.
या हल्ल्यात मारले गेलेले जवान गडचिरोली जिल्ह्यातल्या शीघ्र कृती दलाचे जवान होते.गस्तीवर जाणाऱ्या जवानांना लक्ष्य करुन नक्षल्यांनी हा हल्ला केला होता. या हल्ल्याने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता. या घटनेने महाराष्ट्र दिनी पोलीस दलावर शोककळा पसरली.
1 मे रोजी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास जलद प्रतिसाद पथकातील जवान खासगी वाहनाने कुरखेडा येथून पुढे जात होते. यावेळी कुरखेड्यापासून ६ किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळील पुलावर नक्षलींनी भूसुरुंग स्फोट घडवला. या घटनेच्या एक दिवस आधी नक्षलवाद्यांनी मध्यरात्री राष्ट्रीय महामार्गावरील कंत्राटदाराच्या ३६ वाहनांचीही जाळपोळ केली होती.
साहुदास बाजीराव मडावी, प्रमोद महादेव भोयर, राजू नारायण गायकवाड, किशोर यशवंत बोबाटे, संतोष देविदास चव्हाण, सर्जेराव एकनाथ खर्डे, दयानंद ताम्रध्वज शहारे, भूपेश पांडुरंग वालोदे, आरिफ तौशिब शेख, योगाजी सीताराम हलामी, पुरणशहा प्रतापशाह दुगा, लक्ष्मण केशव कोडापे, अमृत प्रभुदास भदाडे, अग्रमान बक्षी रहाटे, नितीन तिलकचंद घोडमोरे, अशी या हल्ल्यात वीरमरण आलेल्या पोलीस शिपाईंची नावे होती.