गडचिरोली - सिरोंचा येथील प्राणहिता नदी घाटावर पुष्कर कुंभमेळा 13 एप्रिलपासुन सुरू झाला आहे. याठिकाणी दर 10 ते 15 हजार भाविक दररोज पुण्यस्नानसाठी दाखल होत आहेत. यावेळी भाविक विविध पुजा सामग्री नदी पत्रात इतरत्र टाकत आहेत. यामुळे नगर पंचायतकडून स्वच्छता मोहीम सुरू असल्यातरी तेवढीच यात्रेकरू कचरा टाकत आहेत. हे लक्षात आल्यानंतर तिथे कंट्रोलिंग आफिसर म्हणुन उपस्थित अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटीलसह सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी स्वतः कचरा उचलण्याचा कार्यक्रम हाती घेऊन संपूर्ण परिसर स्वच्छ केला.
स्वच्छतेत शासकीय विभागांपाठोपाठ आता शाळांचाही सहभाग - पुष्करचे नोडल अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांच्या संकल्पनेतून सर्व शायकीय विभागांनी स्वच्छता मोहिम राबविली. आता यातूनच आसपासच्या शाळा महाविद्यालयांनी सहभाग नोंदविण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये राजे धर्मराव महाविद्यालय, सिरोंचा, श्रीनिवास हायस्कुल अंकीसा, सी व्ही रमण महाविद्यालय, सिरोंचा, भगवंतराव कला महाविद्यालय, सिरोंचा तसेच सिरोंचा सेवा समिती यांनी दैनंदिन स्वरूपात नदीघाट स्वच्छ करण्यासाठी सहभाग घेतला आहे. तसेच यापुर्वी शासनाच्या महसूल, बांधकाम विभाग, कृषी विभाग व नगर पंचायत विभागाने स्वच्छता मोहिम राबविली होती. यामूळे जणू काही स्वच्छतेची वारीच सिरोंचा येथे प्राणहिता काठी आल्याचे चित्र आहे.
भाविकांनी सुरू केला डस्टबीनचा वापर - या स्वच्छतेच्या मोहिमेमूळे आता भाविकही निर्माल्य व इतर कचरा डस्टबीनमध्ये टाकताना दिसत आहेत. सिरोंचा घाटावर विविध दुकाने लागली आहेत. त्या ठिकाणी भाविकांना बसण्यासाठी सावलीची मोठ्या प्रमाणात व्यवस्था करण्यात आली आहे. विविध सेवाभावी संस्थांकडून आहार वितरीत केला जात आहे. यामूळे परिसरात कचरा निर्माण होत आहे. सफाई कर्मचाऱ्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात कचरा उचलणे शक्य नसल्याने व स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी सदर संकल्पना धनाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. तहसिलदार सिरोंचा जितेंद्र शिकतोडे यांनी याबाबत नियोजन करून स्वच्छतेसाठी विविध संस्था, शाळांना एकत्रित आणण्याचे कार्य केले.