गडचिरोली - अतिदुर्गम- मागास आणि दळणवळणाच्या सोयी अपुऱ्या असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीने ऑनलाइन परीक्षांचे संयोजन केले होते. मात्र, याच जिल्ह्यातील कोरची तालुक्यात इंटरनेटच्या अडचणींमुळे विद्यार्थी ऑनलाइन परीक्षा देताना त्रस्त झाले आहेत. कोरची तालुक्यात विजेचा लपंडाव आणि इंटरनेट कमकुवत असल्याने विद्यार्थ्यांना कव्हरेजसाठी घराच्या छतावर धाव घ्यावी लागली असल्याचा प्रकार समोर आला आहे. बेडगाव परिसरात काही विद्यार्थिनींना तर गटागटाने चक्क जंगलात बसून ऑनलाइन परीक्षा द्यावी लागली.
छत्तीसगड राज्यातील नेटसेवेचा आधार
कोरची तालुक्यात सातत्याने इंटरनेट कमकुवत असल्याची तक्रार केली जात आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षेबाबत गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. परीक्षा ऑनलाईन होत असल्या तरी इंटरनेटचा असाच खेळखंडोबा सुरू राहिला तर विद्यार्थी ज्ञानाच्याबाबतीत ऑफलाईन राहण्याची शक्यता आहे. अतिदुर्गम मागास गडचिरोलीत ऑनलाइन परीक्षांच्या बाबतीत वेगळी सुविधा निर्माण करण्याची अथवा परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी विद्यार्थी करत आहेत.
परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंटरनेट विस्कळीत
गोंडवाना विद्यापीठाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ८ मार्च ते २७ मार्चपर्यंत तालुक्यातील बी.ए. व बी.एस.सीच्या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिक्षा ७५ मिनिटाची असून त्याकरिता ५० प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. परंतू परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंटरनेट विस्कळीत झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झालेला दिसून आला. काही विद्यार्थी छत्तीसगड राज्यात तर काही लगतच्या देवरी, वडसा, चिचगडसारख्या ठिकाणी परीक्षेकरिता गेले होते. विस्कळीत झालेल्या इंटरनेटच्या सुविधेमुळे बहुतेक विद्यार्थ्यांना परीक्षेपासून मुकावे लागले. सध्यातरी विद्यापीठ प्रशासनाकडे यासाठी कुठलेही उत्तर नाही.