गडचिरोली - सध्या जगभरात कोरोना संसर्गाने थैमान घातले आहे. देशात सुध्दा प्रत्येक दिवशी कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. मात्र, गडचिरोली जिल्ह्यात तूर्तास एकही कोरोना रुग्ण आढळलेला नाही. गडचिरोली जिल्हा कोरोनामुक्त ठेवण्यासाठी जिल्ह्यातील प्रशासन रात्रंदिवस झटत आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या नियंत्रणामुळे हे शक्य झाले आहे.
यापुढे जिल्ह्यात सकाळी 7 वाजल्यापासून सांयकाळी 5 वाजेपर्यंत सर्व दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, विनाकारण नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तर पोलीस इतर राज्यातून येणाऱ्यां लोकांवर करडी नजर ठेऊन आहेत. जिल्ह्याच्या एका बाजूला छत्तीसगड तर दुसऱ्या बाजूला तेलंगणा आहे. रात्री परराज्यातून लोकांची घुसखोरी टाळण्यासाठी पोलीस तत्पर आहेत. घुसखोर गडचिरोलीत येणार नाहीत याची खबरदारी पोलिस घेत आहेत. त्यामुळे आत्ता पर्यंत गडचिरोली जिल्हा ग्रिन झोनमध्ये ठेवण्यात प्रशासनाला यश आले आहे.