गडचिरोली - 29 मार्च रोजी घडलेल्या खोब्रामेंढा-हेटाळकसा चकमकीच्या तब्बल 8 दिवसानंतर या घटनेतील जखमी नक्षलवादी किशोर कवडो याला 6 एप्रिल रोजी गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे.त्याला जखमी अवस्थेत नागपूरच्या रुग्णालयात उपचार सुरू केले आहे. त्याच्यावर खून, जाळपोळ, चकमक असे विविध गुन्हे दाखल असल्याने शासनाने 16 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.
नक्षलवादी जखमी झाल्याचा वर्तवला होता अंदाज-
जिल्ह्यातील खोब्रामेंढा-हेटाळकसा जंगलात गडचिरोली पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये 29 मार्च रोजी चकमक घडली होती. या चकमकीत चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले होते. चकमकीत काही नक्षलवादी जखमी झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.
गोपनीय माहिती आणि नक्षल समर्थकांच्या मदतीने केली अटक-
29 मार्च रोजी घडलेल्या चकमकीत टीपागड दलमचा डीव्हीसी किशोर कवडो वय 38 वर्ष रा. रमनटोला ता. एटापल्ली हा गंभीर जखमी झाला होता. चकमकीनंतर पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी घनदाट जंगलात पसार झाले. मात्र जखमी नक्षलवादी किशोरला पळता आले नाही. तो जखमी अवस्थेत एका गावामध्ये उपचार घेत असताना गडचिरोली पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे नक्षल समर्थक गणपत कोल्हे याच्या मदतीने जखमी किशोरला 6 एप्रिल रोजी अटक केली. त्याच्या पायाला बंदुकीची गोळी लागल्याने तो गंभीर जखमी अवस्थेत होता. त्याची प्रकृती अधिक गंभीर दिसून आल्याने त्याला उपचाराकरिता गडचिरोली पोलिसांनी नागपूर रुग्णालयात हलवले आहे.
16 लाखांचे होते बक्षीस-
किशोरवर 22 चकमकी, 8 खून, 6 जाळपोळ आणि इतर 6 असे अनेक गुन्हे दाखल असून शासनाने त्याच्यावर 16 लाखांचे बक्षिस ठेवले होते, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
हेही वाचा- मोठी बातमी! केंद्राकडून रेमडेसीवीर इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी