गडचिरोली- जिल्ह्यातील भामरागड-आलापल्ली मार्गावरील तलवाडा जवळील रस्त्यावर नक्षलवाद्यांनी मोठमोठी झाडे तोडून रस्त्यावर टाकली आहेत. या झाडांवर बॅनर लावण्यात आली असून त्यात पीएलजीएचा वर्धापन दिवस साजरा करण्याचे आवाहन नक्षल्यांकडून करण्यात आले आहे. नक्षलवाद्यांनी रस्त्यावर झाडे पाडल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.
नक्षवाद्यांनी पाडलेल्या झाडांना लावलेल्या बॅनर व पत्रकामध्ये २ डिसेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत पीएलजीए चा १९ वा वर्धापन दिवस साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशी पत्रकबाजी दोन दिवसापासून सुरू आहे. काही ठिकाणी नागरिकांनीच असे बॅनर व पत्रके काढून जाळून टाकली आहेत. नागरिकांकडून नक्षलविरोधी नारेबाजी करत विरोधही दर्शविण्यात आला आहे. काही ठिकाणी पोलिसांकडून नक्षलवाद्यांनी रस्त्यावर पाडलेली झाडे काढून टाकण्यात आली असून रस्ते मोकळे करण्यात आले आहे. रविवारी १ डिसेंबरला रात्रीच्या दरम्यान पुन्हा पेरमिलीपासून २० ते २५ कि.मी अंतरावर तलवाडा जवळ झाडे तोडून रस्त्यावर टाकण्यात आली. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे आपल्या गंतव्य स्थानापर्यंत पोहोचण्यात प्रवाशांना उशीर होत आहे. त्याचबरोबर दोन दिवसापासून नक्षली पत्रकबाजीमुळे पेरमिली, भामरागड परिसारात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचा- गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी केली आणखी दोघांची हत्या; कमलापूर हत्ती कॅम्पचीही केली तोडफोड