गडचिरोली - नक्षलवाद्यांनी आज (रविवारी) शहीद सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी आलापल्ली-एटापल्ली मार्ग बंद केला. तसेच गुरूपल्ली गावाच्या 2 किलोमीटर समोरील करेम फाट्यावर ठिकठिकाणी बॅनर बांधून पत्रके टाकली आहेत.
2 डिसेंबर पासून नक्षलवाद्यांचा शहिद सप्ताह सुरू आहे. सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी पुरसलगोंदी येथील पोलीस पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची नक्षलवाद्यांनी हत्या केली. तर दुसरीकडे कमलापूर येथील हत्ती कॅम्पमध्येही साहित्याची आणि शेडची मोठ्या प्रमाणात नासधूस केली. त्यापूर्वी 29 नोव्हेंबरला कोरची तालुक्यातील भिमनखोजी येथील मनोज दयाराम हिडको या 17 वर्षीय युवकाची नक्षलवाद्यांनी गळा चिरून हत्या केली होती.
हेही वाचा - नांदेडमध्ये अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी
यानंतर नोव्हेंबरला भामरागड तालुक्यातील छत्तीसगड सीमेलगतच्या अबुजमाड जंगल परिसरात नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक उडाली. चकमकीत 2 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले. घटनास्थळावरून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य जप्त केले होते. मात्र, सप्ताहाचा दिवस उजाडताच पूरसलगोंदि येथील दोघांची हत्या तसेच कमलापूर येथील हत्ती कॅम्पमधील विविध साहित्य आणि शेडची मोठ्या प्रमाणात नासधूस केली.
हेही वाचा - कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे नाव बदलणार? मुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे मागणी
सप्ताहाच्या काळात 6 डिसेंबरला शुक्रवारी नक्षलवाद्यांच्या भामरागड एरीया कमिटीची सदस्य असलेली पार्वती ऊर्फ सुशीला शंकर सडमेक हिला गडचिरोली पोलिसांनी अटक केली. तिच्यावर 6 लाख रुपयांचे बक्षीस होते.