गडचिरोली - जिल्ह्याच्या आरमोरी येथील नवरात्रोत्सव पूर्व विदर्भात प्रसिद्ध आहे. दरवर्षी येथे करोडो रुपयांची उलाढाल व्हायची. मात्र, यावर्षी कोरोना महामारीमुळे 70 वर्षांची परंपरा पहिल्यांदाच तुटली असून करोडोंची उलाढाल आता हजारांवर आली आहे.
गेल्या 70 वर्षांपासून आरमोरीच्या जुना बस स्थानक येथील नवदुर्गा उत्सव मंडळातर्फे दरवर्षी दुर्गा मातेची प्राणप्रतिष्ठा केली जाते. नवरात्रीच्या काळात आकर्षक रोषणाई, देखावे, सामाजिक उपक्रम राबवले जात असल्याने दरवर्षी जिल्ह्यातील तसेच बाहेर जिल्ह्यातील लाखो भाविक या दुर्गा उत्सवात सहभागी व्हायचे. त्यामुळे आरमोरी शहरातील प्रत्येक घरी पाहुणे मंडळींची रेलचेल असायची. नऊ दिवस चालणाऱ्या दुर्गा उत्सवामुळे आरमोरी शहरातील वातावरण भक्तिमय असायचे. शहरात मनोरंजनासाठी मीना बाजार, आकाश पाळणे अशी विविध साधने तसेच लहान मुलांसाठी शेकडो खेळण्यांची दुकाने लागायची. रात्रभर शहरात भाविकांची रेलचेल असायची. त्यामुळे आरमोरीकरांचा आनंद न्याहाळून निघत असे. मात्र यावर्षी कोरोना महामारीमुळे या आनंदावर विरजण पडले आहे.
यावर्षी कोरोनामुळे अतिशय साध्या पद्धतीने व सामाजिक उपक्रमांवर भर देऊन उत्सव साजरा करण्याचे प्रशासनाचे निर्देश आहेत. या निर्देशांचे पालन करत 70 वर्षांची परंपरा खंडित न करता नवदुर्गा उत्सव मंडळाने दुर्गा मातेची प्राणप्रतिष्ठा केली आहे. यावर्षी प्रथमच कोणतेही देखावे करण्यात आलेले नाही. अतिशय छोट्या मंडपात दुर्गा मातेची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी दुरुनच दर्शनाची सोय करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे येथे कोणतेही मनोरंजनाची साधनं किंवा खेळण्यांची दुकाने लागलेली नाहीत. रक्तदान शिबिर तसेच कोरोना संसर्गावर जनजागृती करण्यावर भर असल्याची माहिती नवदुर्गा उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
पाच कोटींची उलाढाल हजारांवर -
आरमोरीच्या दुर्गा उत्सवादरम्यान नऊ दिवस जवळपास पाच कोटींची उलाढाल होत असल्याची माहिती नवदुर्गा उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. मात्र, यावर्षी मनोरंजनाची किंवा इतर कोणतीही साधने लावण्यावर बंदी असल्याने करोडोंची उलाढाल पाच हजारांवर आल्याचे त्यांनी सांगितले.
विविध जिल्ह्यातून येतात भाविक -
आरमोरीचा दुर्गा उत्सव पूर्व विदर्भात प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील अहेरी, सिरोंचा अशा दोनशे किलोमीटर अंतरावरील तालुक्यामधून भाविक वाहन करून खास दर्शनासाठी आरमोरीत येत असायचे. तर लगतच्या चंद्रपूर, गोंदिया, भंडारा जिल्ह्यातीलही शेकडो भाविक या दुर्गा उत्सवात सहभागी होत असायचे. आरमोरीच्या नवदुर्गा उत्सव मंडळातर्फे अगदी गडचिरोली-नागपूर या मुख्य महामार्गालगत मंडपाची उभारणी करून दुर्गामातेची प्राणप्रतिष्ठा केली जायची. दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या लांबचलांब रांगा लागायच्या. परिणामी नागपूर-गडचिरोली मार्गावरील वाहतूक जाम व्हायची. त्यामुळे येथे दरवर्षी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावावा लागत होता. मात्र यावर्षी येथे गर्दी दिसणार नाही.
हेही वाचा - महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीवर समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांची निवड