गडचिरोली - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गडचिरोली येथील कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थिती दर्शवली. या निमित्ताने दीर्घकाळानंतर ओबीसी कल्याण मंत्री व मूळचे गडचिरोलीकर विजय वडेट्टीवार व नाना पटोले यांची एकाच मंचावर उपस्थिती दिसून आली. पटोले यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राहुल गांधी यांची निवड व्हावी, अशी भावना व्यक्त केली. मेळाव्यात याच आशयाचा ठराव हात उंचावून मंजूर करण्यात आला. बहुसंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांचा राहुल यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याकडे कल असल्याचे मत त्यांनी मांडले. उत्साही काँग्रेस जणांमुळे आगामी काळात देशात काँग्रेस अव्वल स्थानी जाणार असल्याचा दावा पटोले यांनी केला.
हेही वाचा - गडचिरोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के.. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, जीवित व वित्तहानी नाही
काल नागपुरात पटोलेंचा भाजपवर गंभीर आरोप
क्रूझवरील ड्रग्ज प्रकरण हे भाजपचे षडयंत्र असून हे सगळे महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. तसेच, यामध्ये ज्यांची नावे पुढे आलेली आहेत ते लोक भाजपचे कार्यकर्ते आहेत, मात्र यातील वस्तुस्थिती एनसीबीने दाखवली नाही. परंतु, सत्य समोर येईल असेही पटोले म्हणाले. ते नागपूरमध्ये मांध्यमांशी बोलत होते.
50 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप
शाहरूख खानच्या पीएला जे लोक भेटले ते सर्व भाजपचेच कार्यकर्ते होते. त्यांचे मोबाईल चेक केले तर, हे सगळेजण एकाच ठिकाणी आलेले असल्याचे स्पष्ट होईल. पण, त्या बैठकीमध्ये केवळ 25 कोटींची मागणी नसून, आर्यन खानला बाहेर काढण्यासाठी शाहरूख खानला जवळपास 50 कोटीच्या खंडणीची मागणी झाल्याचा गंभीर आरोप पटोले यांनी यावेळी केला. हे सगळे राजकारण करून हिंदू - मुस्लीम असा वाद निर्माण करून वातावरण खराब करण्याचे काम भाजपकडून केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
षडयंत्रातील पडद्यामागचे भाजपचे कलाकार पुढे आणावे
शासनाने याची चौकशी केली पाहिजे, गोस्वामी असो की सुनील पाटील नावाचा व्यक्ती असो, ज्यांची नावे अजून पुढे आले नाहीत त्यांच्यावर तातडीने करवाई झाली पाहिजे. त्यासाठी अधिवेशनाची वाट पाहायची गरज नाही, असेही पटोले म्हणाले होते. अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाली पाहिजे. तसेच, या षडयंत्रात पडद्यामागचे भाजपचे कलाकार होते ते पुढे आले पाहिजेत, अशी मागणीही पटोले यांनी केली होती.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची मागणी
समीर वानखेडे, आर्यन खान यांच्या प्रश्नापासून जर वेळ मिळाला तर, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, अशी टीका विनायक मेटे यांनी केली. त्यावर उत्तर देताना पटोले म्हणाले, की सातत्याने शेतकऱ्यांना मदतीची भूमिका काँग्रेस पक्षाची राहिलेली आहे. दहा हजार कोटींचे पॅकेज जाहीर झाले असून ते वाटपही सुरू आहे. मात्र, असे वक्तव्य करून कोणाची वकिली करण्यापेक्षा मुंद्रा पोर्ट कोणाचा आहे, त्याचा उल्लेख करावा, असा पलटवार त्यांनी मेटेच्या टिकेवर केला. तसेच, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज हे मुंद्रा पोर्टवरून आली आहे. या ड्रग्जच्या आहारी जाऊन तरुण पिढीला व्यसनाधीन करून आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे काम केंद्रातील मोदी सरकार करत असल्याचा आरोप देखील नाना पटोले यांनी यावेळी केला होता.
गेल्या वर्षभरापासून तीन काळ्या कायद्यांविरोधात शेतकरी बसले असून त्याकडे लक्ष द्यायला भाजपला वेळ नाही. त्यामुळे, या राजकारणात मला पडायचे नाही. मात्र, त्या सगळ्या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे आणि कठोर कारवाई केली पाहिजे. हे देश चालवण्यात पंतप्रधान यांना रस नाही, त्यामुळे त्यांच्याकडून फारशी अपेक्षा देह हिताच्या निर्णयासंदर्भात करता येत नाही, असेही पटोले म्हणाले होते.
हेही वाचा - नक्षलवाद्यांच्या धमकीनंतरही पालकमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोलीत दाखल; जवानांसोबत साजरी केली दिवाळी