गडचिरोली - देशभरात कोरोनाचे सावट असल्याने संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन लागू केला आहे. या लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करीत मुस्लीम बांधवांनी अत्यंत साध्या पद्धतीने घरीच कुटुंबासमवेत ईद सजारी केली. मशिदीमध्ये हाफीज साहेबांच्या सोबतीला चार जणांनी नमाज अदा केली. प्रशासनाचा आदेशाचे काटेकोर पालन करीत सहकार्य केल्याबद्दल भामरागड पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरिक्षक संदीप भांड यांनी स्वतः मशिदीमध्ये जाऊन मुस्लीम बांधवांना पुष्प गुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
रमजान ईदचे औचित्य साधुन पोलीस स्टेशनमध्ये मुस्लीम बांधवांची बैठक बोलावण्यात आली. रोजे संपल्यानंतर एकमेकांना घरी बोलविने, एकत्र मशिदीमध्ये नमाज पठण करणे या परंपरा सोडून अत्यंत साध्या पध्दतीने ईद साजरी करण्याचे आवाहन पोलिसांनी केले होते.
रमजान ईदनंतर मुस्लीम बांधवांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करीत अत्यंत साध्या पद्धतीने ईद साजरी केली. याबद्दल पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधिक्षक अहेरी मनिष कलवानीया, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवाणे यांच्या मार्गदर्शनाखाली भामरागडचे ठाणेदार संदीप भांड यांनी मुस्लीम बांधवाचा सत्कार केला.
यावेळी पोलीस शिपाई गणेश मडावी, बेगलाजी दुर्गे, संदिप गुरणुले, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संतोष बडगे, सोनु सुकारु भांड उपस्थित होते. तर हाफीज साहब शौनोद्धीन हसन, आसीफ सुफी, शब्बीर खान पठाण, शकील शेख, रहिमान शेख, सलीम शेख, जाफर भाई, अफ्रोज खान पठाण, अश्रफ अली, फीरोज खान पठाण, हमीद बेग मोगल या मुस्लिम बांधवांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.